आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्या महिलांना मधुमेह आहे, त्यांनी बाहेरचे खाणे किंवा पार्टीला जाणे पूर्ण बंद करण्याची गरज नाही. एखाद्या वेळी नियमित डाएटशिवाय काही खाल्ले तर चालू शकते. मात्र, मधुमेह गंभीर असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच आहार घेतला पाहिजे. परंतु, डॉक्टरांनी बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला नसेल तर काळजीचे कारण नाही.
मधुमेह असतानाही थोड्या प्रमाणात घेतलेली साखर पचवण्याची क्षमता शरीरात असते. मात्र, पार्टीला जाताना काही दक्षता घ्यावी. उपाशीपोटी जाऊ नये, भाजलेले हरबरे, धिरडे, अंडे, अक्रोड, बदाम वगैरे खाऊन जावे. रात्री पार्टीला जायचे असेल तर सायंकाळी चहासोबत नाष्टा करावा. बाहेर खाण्यासाठी मल्टिक्विझिन रेस्टॉरंट जावे. तेथे मधुमेहींसाठी आवश्यक असे पर्याय उपलब्ध असतात. मधुमेह असणाऱ्यांनी कॉकटेल, मॉकटेल घेऊ नये. तसेच गोड फळांचा रस घेऊ नये.
रात्रीचे जेवण आठपूर्वी घ्यावे. जेवणाला उशीर होईल, असे वाटत असल्यास घरूनच काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाऊन जावे. तसेच पार्टीच्या ठिकणी सूप, सॅलड किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावेत. सूप किंवा सॅलडने जेवणास सरूवात करावी. सूप वा सॅलड व्हेज किंवा चिकनचे चालू शकते.