भंडारा : आरोग्य नामा ऑनलाइन – वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भंडारातील लाखनी येथे घडली आहे. या दुर्दैवी महिलेचे नाव कुरेशा फत्तु छवारे (४२) आहे. २५ मे रोजी दुपारच्या सुमारास कुरेशा छवारे हिची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तिला प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरा येथे ४ वाजता उपचारासाठी आणण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बडोले कर्तव्यावर असल्याचे परिचर गहाने यांनी सांगितले, पण उपस्थित नसल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर अनेकदा संपर्क करूनही प्रतिसाद दिला नाही. त्यात जवळपास तासभराचा कालावधी गेल्याने रुग्णाची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला लाखनीच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती महसूल, पोलीस व पंचायत समिती प्रशासनास देण्यात आली. गटविकास अधिकारी धीरज पाटील, विस्तार अधिकारी श्रीकांत नागलवाडे, तहसीलदार मल्लिक विरानी, नायब तहसीलदार माळी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांना शांत करून निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. तथा २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना सेवा देण्याची विनंती तालुका प्रशासनास केली.
उपस्थितांच्या मागण्या ऐकूण गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा यांना अहवाल पाठवून डॉ.बडोले यांच्यावर कारवाईची शिफारस केली. पोहरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बडोले यांच्यावर आरोग्य विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे पोहरा ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.