दर दीड मिनिटाला होतो एका क्षयरोग रुग्णाचा मृत्यू
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – देशात गेली ५० वर्षे क्षयरोग नियंत्रणासाठी प्रयत्न होत आहेत. तरीही दर दीड मिनिटाला एका क्षयरोग रुग्णाचा मृत्यू होतो. अंदाजे १० लक्ष क्षयरुग्णांची दरवर्षी नोंद होत नसल्याने ते रुग्ण रोगाच्या निदानापासून व औषधोपचारांपासून वंचित राहत आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने २०२५ पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण ठरविले आहे. क्षयरोगाचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर व एक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अद्ययावत सुवधा, औषधोपचाराच्या नि:शुल्क सोयी उपलब्ध करून देण्यात आलेत. निक्षय सॉफ्टवेअर मार्फत ६९ हजार ४९९ इतक्या क्षयरुग्णांची खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून तर १ लाख ४० हजार ६२७ क्षयरुग्णांची नोंद शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे.
समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. त्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायीकांनी क्षयरुग्णांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंद ही निक्षय संकेतस्थळावर करावयाची आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना शिक्षेची तरतूद आहे. औषधविक्रेत्यांनाही क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरी खासगी दवाखाने, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय प्रयोगशाळा, औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालवण्यात येणारी रुग्णालये, दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी यांनी क्षयरुग्णांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. वाय. बी. कांबळे यांनी केले आहे.