महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या देशात गेल्या दोन दशकांच्या काळात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दोन तृतीयांशपेक्षाही अधिक वृद्धी झाली आहे. महाराष्ट्रात देखील कॅन्सरचे रूग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार , मागील दोन वर्षांत राज्यात कॅन्सरचं प्रमाणही वाढलं आहे. यामध्ये तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे.
कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हावं, यासाठी राज्य सरकारने ३० वर्षांवरील सर्व लोकांची कॅन्सर स्क्रिनिंग कार्यक्रम सुरू केला होता. या स्क्रिनिंगद्वारे मागील वर्षी जवळपास दोन कोटी लोकांची तपासणी करण्यात आली. कॅन्सरसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्यात येत असल्याने निदान चाचणी वाढली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर तातडीनं उपचार सुरू होऊन रुग्ण बरा होऊ शकतो.
कॅन्सरवर करण्यात येणाऱ्या उपचारांविषयी माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले की , ‘१३ जिल्हा रुग्णालयं आणि उपजिल्हा रुग्णालयात कॅन्सर निदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फिजिशियन व स्टार्फ परिचारिका यांना टाटा रुग्णालयाद्वारे एक वर्षांचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. टाटा रुग्णावर येणाऱ्या रुग्णांचा भार कमी करणं हा यामागील उद्देश आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. ‘कॅन्सर एक प्राणघातक रोग आहे आणि पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे तो होत असतो. कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान झाले तर त्यावर यशस्वी उपचारही करता येतो.