शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुंबईचे डबेवाले त्यांच्या आगळयावेगळ्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता हेच डबेवाले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आता शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील शाळकरी मुलांना घरचा डबा शाळेत पोहचविण्याची परवानगी मिळावी म्हणून या डबेवाल्यांनी एफडीएकडे परवानगी मागितली आहे.
शाळेच्या कँटिनमधील पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी अशी परवानगी त्यांना हवी होती. परंतु, सुरक्षेचे कारण पुढे करत शाळांनी कँटीनवाल्यांच्या हातात मुलांचे आरोग्य सोपवल्याने डबेवाल्यांची ही सेवा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांनी ही परवानगी मागितली आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील आठ ते दहा शाळांमध्ये डबे पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करत असत. परंतु, ही सुविधा बंद करण्यात येऊन मुलांना कॅन्टीनचा पर्याय देण्यात आला. या कॅन्टीनमधील स्वच्छता, पदार्थ बनवण्याची पद्धत, यांचा विचार करून मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घरचा डबा उत्तम ठरतो. आणि हा डबा मुलांना मिळावा यासाठी डबेवाल्यांना परवानगी देण्याची मागणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची भेट घेण्यात आली आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि मुंबईचे डबेवाले यांच्यात बैठक होणार असून त्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. दरम्यान, शाळेतील कॅन्टिनमध्ये चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ बनविले जावेत यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील कॅन्टिनसाठी एफडीएने खास नियमावली तयार केली होती.