आरोग्यनामा आनलाइन – अनेकदा तळणीचे पदार्थ तयार झाले की शिल्लक तेल तसेच बाजूला ठेवले जाते. हेच तेल अनेकजण पुन्हा तळणासाठी वापरतात. परंतु, तेलाचा अशाप्रकारचा पुनर्वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. शिवाय ज्यांना ब्रेस कॅन्सर आहे अशा रूग्णांसाठी तर असे तेल म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण ठरू शकते. अशा तेलात तळलेले पदार्थ ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या रूग्णाच्या खाण्यात आल्यास मेटास्टेटित ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी झपाट्यानं वाढतात आणि त्या शरीरात सर्वत्र पसरातात, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे तळणासाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरताना काळजी घेतली पाहिजे किंवा असे तेल न वापरणेच योग्य. अशा तेलाने ब्रेस्ट कॅन्सरग्रस्ताला धोका असला तरी निरोगी व्यक्तीवरही त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अॅट अर्बना-शॅम्पियननं केलेलं हे संशोधन कॅन्सर प्रिव्हेंशन रिसर्च या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.
हे संशोधन करताना संशोधकांनी प्रथम हा प्रयोग उंदरावर केला. उंदरांना आठवडाभरासाठी कमी चरबीयुक्त आहार देण्यात आला. त्यानंतर १६ आठवडे काही उंदरांना गरम न केलेलं ताजं सोयाबीन तेल दिलं तर काही उंदरांना पुन्हा पुन्हा गरम केलेलं सोयाबीन तेल दिलं. अनेक रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ तळण्यासाठी सोयाबीन तेल वापरतात म्हणून संशोधनासाठी सोयाबीन तेल निवडलं होतं.
संशोधकांनी उंदारमध्ये ४ टी १ ब्रेस्ट कॅन्सर पेशी सोडल्या. या ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी खूप आक्रमक असतात आणि इतर ठिकाणी झपाट्यानं मेटाटिस्टिट (शरीराच्या अन्य अवयवांमध्ये पसरणे) होतात. या पेशी विशेषत: लिम्फ नोड, यकृत आणि फुफ्फुसामध्ये पसरतात. उंदराच्या शरीरात ब्रेस्ट कॅन्सर पेशी सोडल्याच्या २० दिवसांनंतर दोन्ही गटातील उंदरांच्या मेटासिस्टिक कॅन्सरमध्ये फरक दिसून आला. ताजं तेल दिलेल्या उंदरांच्या तुलनेत ज्या उंदरांना वारंवार गरम केलेलं तेल देण्यात आलं त्यांच्यातील कॅन्सर ट्युमर ४ पटीनं मेटासिस्टेटिक झाला होता. कॅन्सर हा फक्त जैविक घटकांमुळेच नव्हे तर जीवनशैलीतील घटकांमुळेही होतो. जर आहारामुळे ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांचं आयुष्यमान वाढत असेल, तर त्यादृष्टीने काळजी घेतली पाहिजे.