आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळीच्या दरम्यान कोणत्या आणि कशा पद्धतीच्या साधनांची निवड करावी याचा अनेकांना समज नसतो. बाजारात मासिक पाळीच्या वापरात येणारी विविध साधने उपलब्ध असतात. या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधनांची निवड महिला ते त्वचेला पूरक असणारे आणि आर्थिक विचार करून घेत असतात. या साधनांमध्ये दक्षता न घेतल्यास कोणता त्रास होऊ शकतो तेही जाणून घेऊ
कापड
अनेक भागात आजही मासिक पाळीच्या दरम्यान कापडाचा वापर केला जातो. आणि हे कापड धुवून पुन्हा वापरण्यात येते, पण या दरम्यान हे कापड नीट वाळवणे, नीट धुणे फार गरजेचे असते. तर या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास योनीचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हे कपडे धुवावे लागत असल्याने याचा वापर करणे शक्यतो टाळले पाहिजे. परंतु दर महिन्याला बाजारातील पॅड्स विकत घेऊन वापरणे शक्य नसल्यास कापडाचा पर्याय निवडत असाल तर त्याच्या स्वच्छतेकडेही तितकेच लक्ष द्या.
सॅनिटरी पॅड्स
अनेक महिला, मुली मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. यात रेग्युलर, लार्ज, ते अल्ट्रा थिन असे विविध प्रकार असतात. हे पॅड एकदाच वापरण्यासारखे असून कापूस, प्लास्टिक आणि शोषक जेल यापासून बनवले जातात. परंतु हे पॅड्स दार चार ते सहा तासांनी बदलणे अपेक्षित असते. जर रक्तस्राव अधिक असल्यास दोन ते तीन तासांनी हे पॅड बदलावे. दिवसभर एकच पॅड वापरू नये यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
टॅम्पून्स
टॅम्पून्स म्हणजे एक प्रकारे कापसाचा गोळा. योनीच्या आतल्या बाजूस घालून हे वापरात येतात.शक्यतो याचा वापर विवाहित महिलांनी करावा. अधिक काळ योनीमार्गात हे साधन राहिल्यास इथली जागा अतिकोरडी होण्याची शक्यता असते . यातून इतर तक्रारी उद्भवण्याची ही शक्यता असते. त्यामुळे याचा वापर करीत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बदलल्यानंतर हातांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
मेनस्ट्रअल कप
हे साधन जास्त प्रचलित नसला तरी हे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आहे. योनीच्या आत ठेवण्यात येणाऱ्या या कप मध्ये रक्तस्राव शोषला जात नाही तर साठवला जातो. यात एकदाच आणि पुनर्वापर करता येणारे असे दोन्ही प्रकार आहेत. सुरुवातीला हे साधन योनीत नीट बसवणे महत्त्वाचे आहे. तसेच कप काढतानाही नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे. शक्यतो विवाहित महिलांना हे साधन वापरण्याचा सल्ला दिला जातो.