आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लक्ष विचलित होणे ही समस्या अनेकांना भेडसावते. काम खूप आणि महत्वाचे असते. पण, सतत लक्ष विचलित होत असल्याने ते पूर्ण होत नाही. ही समस्या केवळ मोठ्यांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्येही दिसून येते. याचे परिणाम आपल्या कामावर होतात. आणि त्यामुळे पुन्हा मानसिक तणाव वाढू शकतो. ही समस्या भेडसावत असल्यास एकाग्र होण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे, असा त्याचा अर्थ आहे.अशा परिस्थितीला अनेकदा आजूबाजूचे सदोष वातावरणही कारणीभूत ठरत असते. तसेच अनेकवेळा पीडित स्वत:च दोषी असतो. या समस्येवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.
एकाग्रता वाढविण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी प्रथम माहिती करून घेतली पाहिजे. नंतर त्या गोष्टींचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. कोणतेही महत्त्वाचे काम करताना किंवा अभ्यास करताना एकाग्रता भंग करणाऱ्या घटकांपासून नेहमी दूर राहावे. टीव्ही, संगीत यासारखी उपकरणे किंवा अधिक गजबजलेल्या जागेची निवड करू नये, कारण यामुळे लक्ष जास्त विचलीत होते.कामे लवकर उरकण्यासाठी काहीजण अनेक कामे एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे एकही नीट पूर्ण होत नाही. अशाप्रकारे एकत्र किंवा एकाचवेळी दोन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण यामुळे सर्वच कामे बिघडण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी एकही काम एकाग्रतेने होऊ शकत नाही.
प्रत्येक कामाचे प्राधान्य ठरवून घेतले पाहिजे. अभ्यास किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी सकाळची वेळ सर्वांत चांगली असते. तसेच सकाळच्या वेळी मेंदूची कार्यक्षमता अधिक चांगली असल्याने सकाळी अभ्यास अथवा महत्वाचे काम करावे.ध्यानधारणा करणे हा एकाग्रता वाढवण्यासाठी चांगला पर्याय असून यामुळे व्यक्ती लक्षपूर्वक नवीन माहिती ग्रहण करण्यात सक्षम होते. तसेच यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते. नवीन व्यक्तीची भेट घेतल्यानंतर तिचे नाव लक्षात राहत नसेल तर चर्चेदरम्यान त्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलावे. यामुळे प्रत्येक नवीन व्यक्तीचे नाव तुमच्या लक्षात राहील. मेंदूची कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर झोपावे. विचारांवर योग्य नियंत्रण नसल्यासदेखील वारंवार लक्ष विचलीत होते. मानसिकदृष्ट्या निराश असणे किंवा वैचारिक गोंधळ होत असल्यामुळेही असे होते. वरील गोष्टींचे काटेकोर पालन केले तर तुमची एकाग्रता वाढू शकते. तसेच कामेही वेळेवर पूर्ण होतील.