सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खोबरेल तेल हे भारतात मोठ्याप्रमाणात वापरले जाते. सौंदर्यवृद्धीसह जेवणातही खोबरेल तेलाचा वापर केला जातो. या तेलात अनेक औषधी गुणधर्म असल्याने विविध औषधांमध्येही खोबरेल तेल आणि त्यामधील घटकांचा वापर केला जातो. आपल्याकडे साधारण केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी महिला खोबरेल तेलाचा वापर करतात. केस लांब, दाट आणि सुंदर बनवण्यासाठी ते वापरले जाते. परंतु, खोबरेल तेलाचे आणखी खूप फायदे आहेत, जे अनेकांना माहित नसतात. खोबरेल तेलाचा वापर करून सौंदर्य वाढविण्याचे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चराइझ करते. तसेच याच गुणधर्मामुळे त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो. हे तेल रोज लावल्यास त्वचेवरील डागांचा रंग निवळू लागतो. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सुरक्षित राहतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. मेकअपचा वॉटरप्रूफ मस्कारा काढताना त्रास होतो. अशा वेळी कॉटनवर खोबरेल तेल लावून डोळ्यांचा मेकअप काढता येतो. या तेलाने वॅक्स, वॉटरप्रूफ मेकअप सहज निघतो. त्वचेमधील आद्र्रता टिकून राहते. मेकअप काढल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होते.
केसांची चमक वाढवण्यासाठी दररोज थोडेसे खोबरेल तेल केसांच्या मुळाशी लावावे. हे तेल लावल्याने रंगही उजळतो. मेकअप केल्यानंतर खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब हातांवर घेऊन गालांवर चोळल्यास चेहरा चमकदार होतो.
दोन चमचे तांदळाच्या पिठात, दोन चमचे सेमोलिना आणि खोबरेल तेल घालावे. यात पाच चमचे दूध टाकावे. हे मिश्रण पाच मिनिटे तसेच ठेवून नंतर अंगाला लावावे. आठवड्यातून चार दिवस असे केल्यास त्वचा मुलायम होते. यामुळे हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा जाणवणार नाही. क्रीमऐवजी खोबरेल तेलाने त्वचेवर मालिश केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. शिवाय चेहराही उजळतो. खोबरेल तेलाने त्वचेला नैसर्गिक आद्रता मिळते. तसेच हे तेल अँटिसेप्टिकही असून जखमेवर किंवा भाजलेल्या जागेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. दररोज झोपण्यापूर्वी हातांना खोबरेल तेल लावल्यास हात सुंदर होतात. रोज लावल्यामुळे ते त्वचेत खोलवर झिरपून कोरडेपणा किंवा संसर्गाची शक्यता कमी होते.