आतापर्यंत ५६ हजार गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत

devendra-fadanvis

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – गरीब आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच निधीतून त्यांच्या कार्यकालात आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मदत करण्यात आली आहे. विविध आजारांनी ग्रस्त रूग्णांना या निधीतून साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागरिकांना सरकारी रुग्णालयांबरोबरच आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा देण्यात येतात. या योजनांचा लाभ न मिळू शकणाऱ्या आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात येते. वैद्यकीय मदतीअभावी कोणीही गरजू रुग्ण वंचित राहू नये यासाठी मदत केली जाते.

पैशाअभावी रूग्णावर उपचार करण्यात अडचणी येऊ नयेत, गरीब-गरजू रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. केवळ आर्थिक आणि राज्याचा रहिवासी एवढ्याच निकषावर गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत देण्यात येत आहे. कर्करोग, मेंदू आणि मज्जारज्जू संबंधातील आजार, अर्भकांना लागणारे वैद्यकीय सहाय्य, हृदयरोग, मुत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण अशा विविध उपचारांसाठी हा निधी देण्यात येतो. राज्यातील प्रत्येक गरीब व गरजू रुग्णापर्यंत मदत पोहोचावी यासाठी गेल्या चार वर्षात शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेत. राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात येते.

शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक संस्थांकडून मोठे योगदान मिळाले आहे. या संस्थांमुळे मोठी आर्थिक मदत उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या योगदानामुळे गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणे शक्य होत आहे.गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २००९ ते २०१४ मध्ये सुमारे १६ हजार रूग्णांना ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रूपये देण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ ते २० जून २०१९ या काळात ५६ हजार ३१८ रूग्णांना ५५३ कोटी ९२ लाख १९ हजार ५९८ रूपये वितरित करण्यात आले. वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांचा समावेश केल्यामुळे २०१८-१९ मध्ये १० हजार ५८२ रूग्णांना १ हजार कोटींहून अधिक सहाय्य दिला. कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रूग्णांना सुमारे ९० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. यापूर्वी गंभीर आजारांसाठी केवळ २५ हजार रूपये वितरित करण्यात येत होते. मात्र, २०१४ पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी तीन लाखापर्यंत निधी देण्यात येत आहे.