आरोग्यनामा ऑनलाइन – इंग्लंडच्या साऊथप्टन विद्यापीठातील प्राध्यापक विल्यिम कीविल यांनी असं सांगितलं आहे की, स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. त्यामुळं स्मार्टफोनचा वापर केल्यानंतर हातानं चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि सॅनिटाईज करावेत. कारण स्मार्टपोनच्या स्क्रीनवरही कोरोना असू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे.
कीविल यांनी असंही सांगितलं आहे की, एखाद्या निर्जीव पृष्ठभागावर कोरोना व्हायरस जवळपास 1 आठवडा जिवंत राहू शकतो. एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर शिंक किवा कफच्या माध्यमातून तो बाहेर पडतो. अशा व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानंही कोरोनाची लागण होते.
अमेरिकेतील आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी) कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, स्टील आणि तांब्याच्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरस 2 तास जिवंत राहू शकतो. याशिवाय कार्डबोर्ड आणि प्लास्टिकवरही हा व्हायरस बराच काळ राहतो. मानवी शरीराच्या बाहेर 9 दिवस हा विषाणू जिवंत राहू शकतो. म्हणून अल्कोहोल वाईप्सनं फोनची स्क्रीन साफ करावी. यामुळं हा व्हायरस मरतो. याशिवाय हातही सॅनिटाईज करायला हवेत. यामुळं तुम्ही संक्रमणापासून दूर राहता.