मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – लठ्ठ मुलांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचं समुपदेशन करण्यासाठी मुंबईतील भाटिया रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. भारतात ५.७४ ते ८.८२ टक्के शालेय मुले लठ्ठ आहेत. या लठ्ठपणामुळे मुलांना शारीरिक समस्यांसह वर्तवणुकीसंबंधीच्या समस्या तसेच डिप्रेशन येऊ शकते. कोणी चिडवल्यास अशा मुलांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, असे असे तज्ज्ञ सांगतात.
भाटिया रूग्णालयात मुलांचे डॉक्टारंमार्फत तपशीलवार मूल्यांकन करून त्यांच्या गरजेनुसार उपचार केले जातील. मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. लठ्ठ लहान मुलांसाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेवेत सध्या प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरूडे हे व्हिजिटिंग स्पेशालिस्ट आणि समुपदेशक आहेत.
लहान वयातील लठ्ठपणामुळे कमी वयात मधुमेह आणि हायपरटेंशनसारखे आजार होण्याचा धोका असतो. लहान वयात लठ्ठपणामुळे श्वास घेण्यात अडथळे, हायपरटेंशन, फ्रॅक्चरचा अधिक धोका, मासिक पाळी आणि तारुण्यासंबंधी समस्या आणि मानसिक समस्या उद्भवतात. अशा मुलांच्या निरोगी भविष्यासाठी वेळीच उपचारांची गरज असते. यासाठीच मुंबईतील भाटिया हॉस्पिटलने लठ्ठ लहान मुलांसाठी ओपीडी सेवा आणि समुपदेशन सुरू केले आहे.
याबाबत माहिती देताना भाटिया हॉस्पिटलचे सीईओ डॉ. राजीव बौधनकर म्हणाले, लठ्ठ मुलांना सर्वसमावेशक अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भाटिया हॉस्पिटलने तज्ज्ञ अशा टीमची नियुक्ती केली आहे. मुलांच्य लठ्ठपणावर वेळीच उपचार झाले नाही तर भविष्यात म्योकार्डिअल इन्फ्रॅक्शन आणि स्ट्रोक यासारखे कार्डिओ व्हस्क्युलर डिसीज सारखे आजार होऊ शकतात. प्रत्येक मुलानुसार लठ्ठपणावरील उपचार वेगळे असतात. उपचार सुरू करण्यापूर्वी समुपदेशन करणेही महत्त्वाचे असते.