आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाणा प्रचंड वाढल्याने लोकांना विविध आजार होऊ लागले आहेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतात. खाद्यपदार्थात भेसळ आहे, अथवा नाही हे ओळखता आल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. म्हणूनच आपण काही प्रमुख खाद्यपदार्थातील भेसळ कशी ओळखावी हे जाणून घेणार आहोत.
अशी ओळखा भेसळ
चहा पावडर
चहापत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे.
पनीर
पनीर थोड्या पाण्यात घालून उकळवा. थंड झाल्यावर त्यावर आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासा. पनीर जर निळे झाले, तर दुकानदारा अथवा संबंधीत विभागाकडे तक्रार करा.
मध
कापसाची वात मधात भिजवून पेटवा. वात तेवत राहिली तर मध शुद्ध आहे. भेसळयुक्त मधातील वात सहजासहजी जळत नाही. तडतडते.
खोबरेल तेल
खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवा. जे गोठेल ते खोबरेल तेल आणि बाकीची भेसळआहे.
धने पावडर
थोडे पाणी घेऊन त्यात धने पावडर शिंपडा. भुसा असेल तर तो पाण्यावर तरंगतो.
जिरे
थोडे जिरे तळहातावर घेऊन ते चोळावे. ते काळे पडले तर भेसळ आहे.
काळी मिरी
भेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते. शिवाय हलकासा रॉकेलसारखा वास येतो.
दुध
१० मिली. दूध तेवढ्याच पाण्यात मिसळून हलवा. फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. सिंथेटिक दूधाला फिक्कट पिवळा रंग येतो.
लाल तिखट
चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात टाका. पाणी रंगीत झाले तर भेसळ आहे.