आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिक सक्रियता वाढवण्यासाठी आणि तरतरी येण्यासाठी कॅफिन खूपच उपयुक्त आहे. मात्र, कॅफिन सेवनाचा अतिरेक झाल्यास अनिद्रा, छातीत जळजळ होणे, दातांशी संबंधित विकार आणि तणाव अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कॅफिनची सवय ही खूप घातक असून ही सवय म्हणजे आरोग्याशी संबंधित समस्यांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. परंतु, ही सवय संबंधित व्यक्तीच्या लवकर लक्षात नसल्याने आपण कधी गंभीर समस्यांच्या जवळ गेलो हे कळत नाही.दिवसा डायट कोक घेतल्याशिवाय राहू न शकणारे कॅफिनच्या आहारी जातात. द हेल्दी गाइड टू अनहेल्दी लिव्हिंग या पुस्तकाचे लेखक डेव्हिड जे. क्लेटन यांनी सांगितले आहे की, डायट कोकच्या एका कॅनमध्ये जेवढे कॅफिन असते, तेवढे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.ज्यांना दिवसा आळस येतो किंवा कंटाळा आल्यासारखे वाटते त्या व्यक्ती कॅफिनवर अवलंबून असण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी व्यक्तीला अंगात ऊर्जा संचारल्यासारखे वाटते; परंतु लवकरच त्याचा परिणाम कमी व्हायला लागतो. याशिवाय त्यामध्ये असलेला सोडा दातांच्या एनॅमल्सचे नुकसान करतो. तसेच जर तुम्ही त्याचे सेवन केले असेल तर ब्रश जरूर करा, जेणेकरून दातांचे नुकसान होणार नाही.
याचा आणखी एक धोका म्हणजे निद्रानाशाची समस्या उद्भवण्याचा असतो. झोपेशी संबंधित समस्यांसाठीही कॅफिन मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे. विशेष करून रात्री झोपण्याच्या एक ते दोन तास आधी चहा-कॉफीचे सेवन कदापी करू नाका. कॅफिनमुळे झोप येत नाही. कॅफिन फक्त कॉफीमध्येच असते, असा भ्रम अनेकांना असतो; परंतु हे चुकीचे आहे. चहामध्येही कॅफिन असते. हातांना घाम येणे, हृदयाचा वेग वाढणे आणि सतत घाबरल्यासारखे वाटणे ही तुम्ही कॅफिनचे अतिसेवन करत असल्याची लक्षणे आहेत. कॅफिनमुळे डिप्रेशनची समस्या आणखी वाढू शकते. कारण हे कॅफिन अँडेनॉसिन नावाच्या न्युरोट्रांस्मिटर रसायनामध्ये हस्तक्षेप करतात. तसेच कॅफिनमुळे अँड्रेनल ग्रंथीची सक्रियतासुद्धा वाढते. त्यामुळे अँड्रेनलिन नावाच्या स्ट्रेस हार्मोनची अधिक निर्मिती होऊ लागते. परिणामी तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढते.
अन्ननलिकेतून अन्नाचे कण व पोटाचे अँसिड विरुद्ध दिशेने म्हणजेच तोंडाच्या दिशेने परत येऊ लागते तेव्हा या समस्येला हार्ट बर्न म्हणतात. छातीत जळजळ होत असल्यासारखे वाटते. कॅफिनचे अतिसेवन हे याचे प्रमुख कारण असू शकते. जर ही लक्षणे दिसून आली तर सर्वप्रथम कॅफिनवर नियंत्रण ठेवावे.लघवीचा रंग पिवळा किंवा नारिंगी दिसत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता आहे, असा त्याचा अर्थ होतो. हे डिहायड्रेशनचे संकेत आहेत. कॉफीचे अतिसेवन केल्यास व्यक्ती लघवीसाठी प्रेरित होते. त्यामुळे तिच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. दिवसातून एक किंवा दोन कप कॉफीचे सेवन करणे नुकसानकारक नसले तरी यापेक्षा जास्त प्रमाण कॉफी पिणे घातक ठरू शकते.