‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बल्जिंग डिस्क हा आजार सध्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याची सवय असेल तर बल्जिंग डिस्क होऊ शकतो. याची सुरुवात पाठीच्या मणक्यापासून होते आणि त्याचा प्रभाव हळूहळू शरीराच्या अन्य भागांवरही होतो. वेळीच यावर उपचार घेतले नाहीत तर संपूर्ण शरीरामध्ये वेदना होतात. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही काही दिवसांपूर्वी बल्जिंग डिस्क आजार असल्याचे निदान झाले होते.
कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यास हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. ३० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना हा आजार होतो. जे लोक यावर उपचार करत नाहीत. त्यांना युरिन किंवा इंटेस्टाइनशी संबंधित आजार होऊ शकतात. लागोपाठ एकाच ठिकाणी बसू नका. कार्यालयात काम करत असताना आपली पोझिशन बदलत राहा. नेहमी पोश्चर योग्य ठेवा. योग्य पोश्चरमध्ये बसणे किंवा चालल्याने हा आजार टाळता येतो. हा आजार टाळण्यासाठी वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. लठ्ठपणा वाढल्याने इतर आजारांसह हा आजार होण्याची शक्यतादेखील वाढते. पौष्टिक आहार घेतल्याने देखील बल्जिंग डिस्कपासून बचाव करता येऊ शकतो. आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जीवनशैली बदला. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहत हा आजार टाळता येऊ शकतो.
या आजारामध्ये कमरेच्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होतात. अनेकदा मानेमध्ये दुखायला लागते आणि त्रास वाढल्यानंतर खांदे व हातांमध्येही वेदना होतात. या वेदना खोकला किंवा शिंक आल्यावर जास्त होतात. बल्जिंग डिस्क झाल्यावर हाता-पायांमध्ये ठणक निर्माण होते. सोबतच स्नायूंमध्येही वेदना होतात. यामुळे वस्तू उचलताना किंवा खाली वाकतानाही वेदना होतात.
या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फिजियोथेरपीद्वारेही यावर उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हळूहळू स्नायूंमध्ये लवचिकता येण्यासोबतच वेदनेपासूनही आराम मिळतो. फिजियोथेरपिस्टला न दाखवता कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याचे टाळले पाहिजे. अन्यथा समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. तुम्ही वाकून चालत असाल किंवा बसत असाल तर तुम्हाला बल्जिंग डिस्क आजार होण्याची शक्यता वाढते. जर तुमच्या हाता-पायांमध्ये ठणक असेल तर हे बल्जिंग डिस्कचे कारण असू शकते.