आरोग्यानामा ऑनलाइन टीम – रक्तचाचणीत टेलोमिअर्सच्या तपासणीतून संबंधित व्यक्तीचे जैविक वय काय असेल हे समजू शकते. टेलोमिअर्स हे क्रोमोझोम्सच्या शेवटी सापडणारे प्रोटेक्टिव्ह कॅप्स असतात. त्यांच्या लांबीनुसार व्यक्तीच्या जैविक वयाची माहिती मिळू शकते, असे, शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. एखादी व्यक्ती किती काळ जगेल हे या चाचणीत समजते. तसेच व्यक्तीच्या वाढत्या वयात तिला कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागेल हेही या चाचणीतून समजते.
एखादी व्यक्ती किती वर्षे जगणार आणि केव्हा वृद्ध होणार हे जाणून घेणे यामुळे शक्य आहे. एक सर्वसाधारण रक्तचाचणी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. वाढत्या वयात व्यक्तीला कोणते आजार होतील, कोणते बदल होतील हेही टेलोमिअर्सच्या साह्याने कळू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कर्करोग, हृदयविकार व अल्झायर्मसची माहिती त्याद्वारे मिळू शकते. प्रत्येक मूल २३ क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे आईकडून आणि २३ क्रोमोझोम्स वडिलांकडून ग्रहण करते. प्रत्येक क्रोमोझोम्सच्या शेवटी ९२ टेलोमिअर्स असतात.
टेलोमिअर्स हे बुटाच्या टोकाला असलेल्या प्लास्टिक कॅपसारखे असतात. या विषयावर १९ वर्षे संशोधन करण्यात आले. टेलोमिअर्स लहान असतील तर हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका अनुक्रमे ५० टक्के आणि २५ टक्के वाढत असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. ही रक्तचाचणी थोडीशी महागडी आहे. या संशोधनात सहभाग घेतलेले डॉ. शेय हे लाइफ लेंथ नावाच्या स्पेनच्या टेलोमिअर टेस्टिंग कंपनीशी निगडित आहेत. त्यांच्या मते, टेलोमिअर जीवनाचे घड्याळ म्हणून करते. टेलोमिअर्सची लांबी घटत असेल तर समजावे की व्यक्तीच्या पेशींचे वय घटत आहे. लांब टेलोमिअर्स म्हणजे निरोगी व दीर्घ आयुष्य होय.