आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका सर्वजण आवडीने खातात. चवीने खाल्ली जाणारी मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे मका केवळ पावसाळ्यातच न खाता तिचा समावेश आहारात केला पाहिजे.
जाणून घेऊया मक्याचे आरोग्यदायी फायदे –
स्नायूंचा विकास होतो-
मक्यामध्ये व्हिटॅमिन्स, फॉस्फरस, मिनरल्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे स्नायूंचा विकास होतो.
हाडं मजबूत बनतात –
मक्यातील मॅग्नेशिअम पेशी, टिश्यूंच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
मक्यामध्ये फॉस्फरस असतं ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. याव्यतिरिक्त मक्यात झिंक असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.
शरीराला ऊर्जा मिळते-
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आहारात मक्याचा समावेश करा.
वजन नियंत्रणात राहतं –
मक्यामुळे शरीराला पुरेशा कॅलरीज मिळतात, शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहतं ज्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
अँटी कॅन्सर घटक-
मक्यामध्ये अँटीकॅन्सर घटक असतात. भाजलेल्या कणीसपासून ५०% अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कॅन्सरवर हे लाभदायक आहे.
सर्दी-कफ कमी होतो –
मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मक्याचे २ तूकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.
तसेच मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते-
हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर आहे. मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.
दृष्टी सुधारते-
मका तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे दृष्टी सुधारते.