आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घर, नोकरी, स्वयंपाक घर, बाळंतपण, मुलांचे संगोपन अशी कसरत करताना अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. महिला पाठदुखीकडे कायम दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर जाते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
ही आहेत कारणे
१) सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात.
२) प्रसूती झाल्यावर किंवा गर्भारपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्यात बहुतेक वेळेस चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते.
३) अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ यामुळे दुखणे बळावते.
४) सतत काम करत राहिल्यामुळे, वाकल्यामुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास उद्भवतो.
५) प्राथमिक दुखणे असताना महिलांना उपचार घेणे जरुरीचे आहे.
६) महिलांवर जबाबदाक्तयांचे जास्त ओझे असल्याने अनेकदा समतोल राखताना त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.
७) महिला छोट्या-छोट्या आरोग्य तक्रारींकडे लक्ष देत नसल्याने याच तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात.
८) पाठीच्या कण्याचा त्रास, डी जीवनसत्वाचा अभाव, कॅल्शियमचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत. म्हणून महिलांनी वेळीच उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.
हे आहेत ६ उपाय
१) वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.
२) एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.
३) टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा, गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा.
४) झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.
५) आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा.
६) पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)