बीड : आरोग्यनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात ९९ रुग्णालयामध्ये ४६०५ महिलांची गर्भाशये अवैधरित्या शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याच्या गंभीर घटनेबाबत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी तारांकित प्रश्न मांडला. ऊसतोड महिला कामगारांना गर्भाशयाच्या कर्करोगाची भीती घालत आर्थिक लूट करणाऱ्या या रुग्णालयांची चौकशी करून ताबडतोब कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बीड येथील ऊस तोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढलेल्याबाबत दि.१२ जून, २०१९ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद,एकल महिला संघटना, महिला किसान अधिकार मंच,जन आरोग्य अभियान व भारतीय महिला फेडरेशन वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते व या चर्चासत्रात बीड जिल्यातील अनेक महिला संघटनांनी आपल्या मागण्या शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्याकडे सादर केल्या होत्या. या मागण्यांची सखोल माहिती घेऊन शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे म्हणाल्या, “आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथजी शिंदे लवकरच सर्वपक्षीय महिला आमदारांची कमिटी नेमणार असून ऊसतोड महिला कामगारांची वर्षातून दोन वेळा शासनातर्फे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य समितीत एमडी स्त्रीरोगतज्ञाची नेमणूक लवकरच केली जाणार असून खाजगी क्षेत्रातील दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे असे आश्वासन आरोग्यमंत्रानी दिले आहे.”
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये गावात मुक्कामी असणार्या महिलांपेक्षा ऊसतोडणी करण्यासाठी स्थलांतर करणार्या महिलांमधलं गर्भाशय काढण्याचं प्रमाण अधिक आहे व सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन *शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक स्त्री व एक माणूस या नात्याने ऊसतोडणी महिला कामगारांचे जीवन सुकर करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी निवदेन दिले होते.