आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कुपोषण ही समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही या समस्येवर काम केले जात आहे. आपल्या आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते. नागरिकांना योग्य आहार मिळावा यासाठी देशात देशात आहारतज्ज्ञांची गरज आहे. ही गरज ओळखून पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशनवर आधारित विशेष कोर्स सुरू करण्यात आला आहे. बारावी पास विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये प्रवेश घेता येणार आहे.
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा नवीन कोर्स आहे. लोक आरोग्याबाबत जागरूक झाल्यानंतर त्यांना विश्वसनीय माहिती, योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. यासाठीच राज्य सरकारने हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. बी. जे. कॉलेजमध्ये या कोर्सची पहिलीच बॅच सुरू होत आहे. दरवर्षी जवळपास ४० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
न्यूट्रिशनबाबत विशेष प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, असे बी. जे. मेडिकल कॉलेजचे उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले. २०१८च्या ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टनुसार जगात कुषोपणाचे प्रमाण मोठे आहे. जगातील प्रत्येक देशावर कुपोषणाचा परिणाम दिसून येतो आहे. वेळीच योग्य पावले उचलल्यास कुषोषणावर मात करता येऊ शकते.