आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दुधाला परिपूर्ण अन्न मानले जाते. दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते. मात्र व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत असलेल्या दुधाचे सेवन केल्यानंतरही काहींना त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे दूध पिण्याच्या चुकीच्या सवयी. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. जाणून घ्या या महत्वाच्या नियमाबद्दल –
आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचे नियम –
ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते. रासायनिक प्रक्रिया केलेले किंवा पिशवी बंद दूध पिणे शक्यतो टाळावे.
दूध पिताना जड वाटत असेल तर त्यामध्ये थोडेस पाणी मिसळू शकता. हे दूध सहजपणे पचते.
आयुर्वेदानुसार कच्चे थंड दूध पिणे चांगले नाही. नेहमी दूध गरम करुन प्यावे. फ्रीजमधून दुध काढून न उकळता पिऊ नये.
रात्री साखर न घालता दूध प्यावे. त्याऐवजी दुधात एक ते दोन चमचे तूप घालू शकता.
कधीही खारट पदार्थांसह दूध घेऊ नका.
दुधासोबत आंबट फळेही खाऊ नयेत.
रात्रीचे जेवण टाळायचे असेल त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे.
ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करुन दुधाचे सेवन करावे.
गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. मात्र जर तुमचे पचनतंत्र मजबूत नसेल तर तुम्हाला दूध पचत नाही. दुधाचे सेवन करताना वरील नियमांचे पालन केल्यास दूध पचेल आणि आरोग्यास लाभ होईल.