आयुर्वेदात सांगितलेले दुध पिण्याचे नियम माहित आहेत का ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दुध हे पूर्णांन्न आहे. शरीराला पूर्ण पोषण दुधामुळे मिळत असल्याने लहान मुलांनाही दुध दिले जाते. दुध शरीर आणि बुद्धीला आवश्यक पोषण प्रदान करते. तसेच थंड, वात आणि पित्त दोषाला संतुलित करते. गायीचे दुध सर्वात पौष्टिक असून ते भूक शांत करते, लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. मात्र, पचनतंत्र मजबूत नसेल तर दुध पचत नाही. दुध पिण्याचे काही नियम आयुर्वेदात सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यास शरीराला चांगला फायदा होतो, तसेच दुधाचे पचनही चांगल्याप्रकारे होते.

अशाप्रकारे प्या दुध

गरम दुध
कच्चे दुध पिणे योग्य नाही. तसेच दुध फ्रीजमधून काढून न उकळता पिणे हेदेखील आरोग्यासाठी चांगले नाही. आयुर्वेदानुसार दुध उकळून, गरम असताना प्यावे. दुध पिताना जड वाटत असेल तर त्यामध्ये थोडेस पाणी मिसळून प्यावे. असे दुध सहज पचते.

ताजे जैविक दुध
पॅकिंगमधील दुध ताजे आणि जैविकही नसते. आयुर्वेदानुसार ताजे, जैविक आणि रासायनिक प्रक्रिया न केलेले दुध शरीरासाठी उत्तम असते. पॅकिंगमधील दुधाचे सेवन करू नये.

देशी गायीचे दुध
देशी गायीचे दुधच सर्वात जास्त आरोग्यदायी फायदे देते, असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. शहरामध्ये हे दुध सहज उपलब्ध होत नाही. शक्यतो देशी गायीचेच दुध प्यावे. आयुर्वेद गायीच्या दुधाचे सेवन करण्यावर जास्त भर देते.

साखर न मिसळेले दुध
बहुतांश लोक दुधात साखर टाकून पितात. आयुर्वेदानुसार रात्री साखर न टाकता दुध प्यावे. दुधामध्ये गायीचे एक चमचा तूप टाकावे, असेही आयुर्वेदात म्हटले आहे.

लवंग आणि विलायची
दुध पचत नसल्यास दुधामध्ये चिमुटभर अद्रक, लवंग, विलायची, केशर, दालचिनी आणि जायफळ इत्यादी सामग्री मिसळावी. यामुळे पोटात अतिरिक्त उष्णता वाढेल आणि यांच्या मदतीने दुध पचन होईल.

दुध आणि केशर
रात्री जेवण न केल्यास दुधामध्ये चिमुटभर जायफळ आणि केशर टाकून दुध प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते. तसेच शरीराला उर्जासुद्धा प्राप्त होते.