आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोड हा असंसर्गजन्य आजार आहे. कुष्ठरोग आणि कोडमध्ये खूप फरक आहे. कोड हा आनुवंशिकरित्या होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्केच आहे. कोडावर उपचारासाठी ससून रुग्णालयात विविध आधुनिक वैद्यकीय आणि सर्जिकल पद्धती उपलब्ध असून, त्यांचा फायदा रूग्णांना घ्यावा, असे आवाहन सहयोगी प्राध्यापिका डॉ. वसुधा बेलगावकर यांनी केले.
कोडबाबत जनजागृतीसाठी बी. जे. मेडिकल जागतिक कोड दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. बेलगावकर बोलत होत्या. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या स्किन आणि व्हीडी विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोडबाबत माहिती, त्यावरील उपचार, त्याबाबत लोकांचे असलेले गैरसमज यावर माहिती देण्यात आली.
यावेळी बी. जे. मेडिकल कॉलेजचे उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी त्वचेच्या या समस्येबाबत जनजागृती किती महत्त्वाची आहे ते नमूद केले. तर यूजी डीन डॉ. अरुग कोवळे यांनी जागतिक कोड दिनाची सुरुवात आणि त्यामागचा इतिहास सांगितला. कोड असलेल्या रुग्णांना भेदभावाची वागणूक देऊ नका. त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी मदत करा, असे आवाहन डॉ. कोवळे यांनी केले.