आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आरोग्य सुधारण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींमध्ये एरोमॅटिक थेरपी ही एक चांगली थेरपी आहे. ही थेरपी आपल्याकडे जास्त प्रचलित नाही. या थेरपीत व्यक्तीला खास फुलांच्या इसेन्शियल ऑइलचा सुगंध दिला जातो. या सुगंधाने व्यक्तीच्या आरोग्यात वेगाने बदल होतो. ८ वेगवेगळ्या सुगंधांचा वापर एरोमॅटिक थेरपीत केला जातो. १९०७ पासून जगात एरोमॅटिक थेरपीची सुरुवात झाली आहे.
दालचिनी
दालचिनीच्या वासाने श्वास मोकळा होतो. अलर्टनेस वाढतो. तसेच अल्झायमरशी लढण्याची शक्ती मिळते. प्रसन्नता वाढते. यासाठी थोडी दालचिनी हातावर रगडून वास घ्यावा. दालचिनी चहामध्ये टाकून पिणेदेखील फायद्याचे ठरते.
लिंबू
याचा आंबट-गोड वास तणाव कमी करतो. तणावात असा वास अत्यंत लाभदायक ठरतो. यासाठी लिंबू, संत्रा, मोसंबीसारख्या फळांना कापून त्याचा वास घ्यावा. तसेच साल हातावर रगडल्यानेदेखील वास घेता येतो.
रोजमेरी
रोजमेरीच्या वासाने एकाग्रता आणि कामाची गती वाढते. याच्या वासाने स्मरणशक्ती वाढते. लहान-लहान गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी मोठी मदत होते. यासाठी आहारात रोजमेरीचा वापर करावा. याच्या वासाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
चमेली
निद्रानाशाचा त्रास असल्यास चमेलीच्या वासाचा फायदा होतो. चमेलीच्या वासाने शरीराला आराम मिळतो. मेंदूच्या पेशींना आराम वाटू लागतो आणि शांत झोप येते. यासाठी खोलीत चमेलीचा सुगंध असणारी अगरबत्ती लावावी.
पुदिना
पुदिन्याचा वास घेतल्याने मेंदू योग्य पद्धतीने काम करतो. पुदिना चावून किंवा हातावर चोळून याचा सुगंध घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच यामुळे दुखणेदेखील कमी होते. गारवा मिळतो. व्यायाम करण्यापूर्वी पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब हातावर टाकून चोळावे. यामुळे व्यायाम करताना उत्साह वाढतो.