अंगणवाडी सेविकांसाठी अमृता वहिनींचा पुढाकार
आरोग्यनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुंबई पालिका शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरसावल्या आहेत. थकलेले वेतन, पोषण आहाराच्या टेंडरबाबतही अडचणी यासाठी अमृता फडणवीस यांनी नुकतीच मुंबई पालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याविषयी माहिती देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, महापालिका शाळेत अन्नपुरवठा करणाèया महिलांचे काही प्रश्न असून टेंडरबाबतीतही त्यांचे काही मुद्दे होते. या महिलांना वेतन वेळेवर मिळणे आणि टेंडर प्रक्रियेतील काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही आयुक्तांसमोर मांडले. काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेतली. महिला सशक्तीकरणाबाबतही आयुक्त लवकरच निर्णय घेणार आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेतअंतर्गत राज्यात सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका काम करतात. यामध्ये मुंबईतील साडे आठ हजार अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. या सेविकांना कामाच्या स्वरूपात मिळणारं मानधन हे अतिशय कमी आहे. सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली असली तरी महाराष्ट्र सरकारने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. तरीही सरकारकडून दखल घेतली जात नाही. २ महिन्यांपासून म्हणजेच मार्च २०१९ पासून त्यांना मानधन मिळालेले नाही. १ मे पूर्वी अंगणवाडी सेविकांचे रखडलेले मानधन न मिळाल्यास सरकारचे कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनही दिले आहे.