आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हवेच्या प्रदूषणामुळेही अनियमित मासिक पाळीचा त्रास होऊ शकतो. किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीवर हवा प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. याबाबतचे संशोधन ह्युमन रिप्रोडक्शन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. मानसिक तणाव, रजोनिवृत्तीचा काळ, लठ्ठपणा आणि वजन कमी होणे अशा कारणांमुळे मासिक पाळी अनियमित होते, असे म्हटले जाते. मात्र, आता त्यामध्ये आणखी एका कारणाची भर पडली आहे.
हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी यूएसमधील महिलांचे आरोग्य आणि यूएस इनव्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीकडून प्राप्त हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला असता १४ ते १८ वयोगटातील मुलींची मासिक पाळी अनियमित असल्याचे आढळले. या मुली प्रदूषित हवा असलेल्या ठिकाणी राहत होत्या. प्रदूषित हवेमुळे त्यांच्या मासिक पाळीवर परिणाम झाल्याचे यावरून संशोधकांनी म्हटले आहे. प्रदूषित हवेमुळे हृदय किंवा श्वसनसंबंधी आजार बळावतात. मात्र संशोधकांनी केलेल्या या संशोधनानुसार प्रदूषित हवा प्रजनन प्रणालीवरही परिणाम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हवा प्रदूषणाचा मासिक पाळीवर नेमका कसा आणि का परिणाम होतो, हे संशोधकांना सिद्ध करता आले नाही.
संशोधकांनी या संशोधनाला याआधीच्या संशोधनाचा आधार दिला आहे. मासिक पाळी हार्मोन्सवर अवलंबून असते आणि याआधी झालेल्या संशोधनात हवा प्रदूषणाचे कण हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम करत असल्याचे म्हटले आहे. प्रदूषित हवेमुळे वंध्यत्व, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे आजार होत असल्याचे दिसून आले होते.शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवर जीवनशैली, शारीरिक कार्य आणि पर्यावरणीय वातावरणाचाही परिणाम होतो. त्यामुळे हवा प्रदूषणाचा हार्मोन्स पातळीवर परिणाम होऊन, मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
प्रदूषित हवेमध्ये ऑक्सिजनचा अभाव असतो. अशी प्रदुषित हवा शरीरात गेल्यास हिमोग्लोबिनची पातळीही कमी होते. त्यामुळे मासिक पाळीबाबत समस्या निर्माण होऊ शकते. किशोरवयीन मुलींवर हवा प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.