दहा लाख रूग्णांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ

ayushman bharat yojana

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – आयुष्मान भारत योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवण्यासाठी व या योजनेची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ही आरोग्य क्षेत्रातील शिखर संस्था भारतीय आरोग्यसुरक्षा महासंघाशी समन्वय साधणार आहे. केंद्र सरकारने २३ सप्टेंबरला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला सुरुवात केली. आतापर्यंत देशभरात दहा लाख रुग्णांनी या योजनेंतर्गत मोफत उपचार घेतले आहेत.

या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. आरोग्य महासंघाकडे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण व राज्य सरकारांनी जर तज्ज्ञांचा सल्ला किंवा अन्य काही माहिती मागवली तर ती देण्याबाबत एक यंत्रणा विकसित करणार आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. देशात आरोग्य क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात खासगी गुंतवणूक यावी तसेच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महासंघाचे योगदान महत्त्वाचे असेल. आयुष्मान भारत योजनेंतर्गत जर उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सरकारी अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठी खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग गरजेचा आहे.