आरोग्यनामा ऑनलाइन टीम : देशात डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकार सुरूच असल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे सावट आहे. हल्लेखोरांवर कारवाई होत नसल्याने आणि न्याय मिळत नसल्याने डॉक्टरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सुमारे ४० टक्के डॉक्टरांना त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये एकदा तरी मारहाणीला सामोरं जावं लागतं. तर महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्याची अशी एक दोन नव्हे तर तब्बल ५३ प्रकरणं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.भीतीच्या वातावरणात डॉक्टरांना काम करणे कठीण झाले आहे. रुग्ण बरा व्हावा, यासाठी अथक प्रयत्न केले जातात. मात्र, ज्यावेळी लोक हल्ला करतात तेव्हा खूप वाईट वाटते. आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांवरील असे हल्ले थांबायला हवेत, असे पुणे आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले.
कोलकात्यातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर डॉक्टरांचा संयम संपला आहे. देशभरातील डॉक्टर एकवटलेत आणि आंदोलन करत आहेत. रुग्णालयातील हिंसाचाराविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने करत आहे. वल्र्ड मेडिकल असोसिएशनदेखील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांमधील हिंसाचाराविरोधात ठराव मंजूर केला आहे आणि याबाबत कठोरात कठोर कायद्याची मागणी केली आहे, असे आयएमएने म्हटले आहे.
तर, डॉक्टरांवर हल्ले झाल्यास त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो. डॉक्टर गुंतागुंतीची आणि गंभीर अशी प्रकरणे घेत नाहीत.जर डॉक्टरांना तणावमुक्त वातावरणात काम करायला दिले नाही तर त्याचा त्यांच्या सेवेवर नकारात्मक परिणाम होतो, असे एका सरकारी डॉक्टरांनी सांगितले. न्याय मिळण्यास उशिर म्हणजे न्याय न मिळणे, जेव्हा आम्ही संपावर जातो तेव्हा रुग्णांची गैरसोय होते. मात्र जेव्हा आम्हाला न्याय मिळत नाही आणि कायदा व आदेशाचे वारंवार उल्लंघन केले जाते तेव्हा आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. लोकशाही व्यवस्थेत योग्य आणि वेळेत न्याय मिळणे खूप महत्त्वाचे आहे. कोलकात्यातील डॉक्टर सध्या जीवनमृत्यूशी झुंज देत आहे. डॉक्टर भीतीच्या छायेत काम करत आहेत.आम्ही रुग्णांचा जीव वाचवतो मात्र आमच्या जीवाला धोका असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या आहेत डॉक्टरांच्या मागण्या
डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांची नोंद व्हावी
पॉक्सो कायद्याप्रमाणे अशा प्रकरणांमध्येदेखील आरोपींना अटक
दोषींना शिक्षा आणि योग्य अशा अनिवार्य तरतुदी असायल्या हव्यात
रुग्णांलयांना स्पेशल झोन म्हणून घोषित करावे
योग्य सुरक्षा पुरवण्याची राज्य सरकारची जबाबदारी असावी
रुग्णालयातील हिंसाचाराविरोधात तात्काळ कायदा आणावा
या कायद्यात कमीत कमी ७ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद असावी
डॉक्टरांवर मागील काही दिवसांत झालेले हल्ले
५ सप्टेंबर, २०१८ : बुलडाण्यातील डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकाकडून मारहाण
११ सप्टेंबर, २०१८ : ठाण्यात अज्ञात व्यक्तीकडून डॉक्टरांवर घराबाहेर हल्ला
१३ मार्च, २०१९ : पुण्यात भाजप नगरसेविकेकडून महिला डॉक्टरांना मारहाण
२८ मे, २०१९ : नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला धक्काबुक्की
११ जून, २०१९ : कोलकात्यात एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर जमावाचा हल्ला