पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुणे जिल्ह्यातील बारामती येथे जन्मलेल्या एका बाळाला जन्मानंतर काही तासांतच हिरव्या उलट्या झाल्या. शिवाय त्याचे पोटही फुगले होते. यानंतर आई वडीलांनी बाळाला बारामतीतील श्रीपाल या लहान मुलांच्या रूग्णालयात दाखल केले. पंधरा दिवसांपूर्वी जेजुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला होता. रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा यांनी तपासणी केल्यानंतर बाळाच्या आतड्यांची वाढ झाली नसल्याचे आढळून आले. यामुळे डॉ. मुथा आणि लहान मुलांचे सर्जन डॉ. नितीन पळसे यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
बाळाला रूग्णालयात आणले तेव्हा त्याला हिरव्या आणि पिवळ्या उलट्या होत होत्या. त्याचे पोटही फुगले होते. तातडीने तपासणी केल्यानंतर बाळाच्या आतड्यांची वाढ झाली नसल्याचे आढळले. यामुळे बाळाला दूधही पचत नव्हते. तातडीने उपचार करणे आवश्यक असल्याने डॉक्टरांनी ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. हे बाळ काही तासांचे असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे अवघड होते. आव्हान स्वीकारून बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शस्त्रक्रियेत वाढ न झालेल्या आतड्याचा खराब झालेल्या भाग काढून टाकला जातो. आणि उर्वरित चांगला भाग जोडला जातो. ही शस्त्रक्रिया पोट उघडून केली जाते. या बाळावर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. आता बाळाची प्रकृती उत्तम असून बाळाला घरी नेण्यात आले आहे. एवढ्या लहान बाळावर ही शस्त्रक्रिया करणे खूप गुंतागुंतीचे, जोखमीचे आणि अवघड असते. क्वचित असा त्रास नवजात अर्थकांना होतो. शिवाय ही शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असे डॉ. राजेंद्र मुथा यांनी सांगितले.