‘ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया’ग्रस्त बाळाला मिळाले जीवदान
मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासियाग्रस्त बाळाला इंटड्ढा पल्मनरी स्टेम सेल थेरपीचा वापर करून डॉक्टरांनी नवीन आयुष्य दिले आहे. मुंबईतील सुर्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रूद्रांश असे या बाळाचे नाव आहे. २६ व्या आठवड्यातच रुद्रांशचा जन्म झाला होता. जन्माच्या वेळी त्याचे वजन केवळ ६०० ग्रॅम होते. त्यास ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया आजार असल्याचे निष्पन्न झाले. श्वसनासंदर्भातील लहान मुलांना होणारा हा गंभीर आजार आहे.
श्वास घेताना त्रासासह अनिमिया झाल्याने रूद्रांशच्या रक्तातील प्लेटलेट्सची मात्रा ही कमी झाली होती. त्याला २४ जुलै २०१८ मध्ये सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत डॉक्टरांनी या बाळाचे प्राण वाचवले. जन्मानंतर साडे आठ महिन्यांनी म्हणजे ११ मार्च २०१९ रोजी रूद्रांशला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याबाबत रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. भूपेंद्र एस अवस्थी यांनी सांगितले की, या बाळावर स्टेम सेल थेरपीचा वापर करून उपचार करण्यात आले. या उपचारांसाठी एका श्वास नलिकेतून फुफ्फुसांमध्ये स्टेम सेल थेरपी देण्यात येते. बरेच महिने या बाळावर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यानंतर या बाळाची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झालयाचे दिसून आले. त्यामुळे या बाळाला आता डिस्चार्ज देण्यात आला.