आरोग्यानामा ऑनलाइन टीम : श्वसनमार्गाच्या एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या पुण्यातील एका चोवीस वर्षांच्या तरूणावर आतापर्यंत तब्बल ५५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ५५ शस्त्रक्रिया केल्यानंतर हा तरूण आता व्यवस्थित श्वास घेऊ शकत आहे. त्याचे नाव अमोल भावरी असे असून त्याला झालेल्या दुर्मिळ आजाराचे नाव आहे रिकरंट रेस्पिरेटरी पॅपिलोमेटोसिस. या आजारात श्वसनमार्गात चामखिळीसारखा एक नॉन कॅन्सर ट्युमर असतो. ज्यास पॅपिलोमास म्हणतात. यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो.अमोल भवरी हा ३ वर्षांचा असताना त्यास आरआरपी हा दुर्मिळ आजार झाला. त्रास होऊ लागल्याने त्यास डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता आरआरपी हा आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे त्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याला नीट बोलताही येत नव्हते की श्वासही घेता येत नव्हता. या अशा त्रासामुळे शाळा, कॉलेजमधील अनेकजण त्यास याबाबत प्रश्न विचारत असत. परंतु, तो काहीच सांगू शकत नव्हता. या आजारामुळे तो केवळ शारीरिकरित्या नाही तर भावनिक आणि मानसिकरित्यादेखील खचला होता.
टेकियोस्टोमी (गळ्यावर छिद्र पाडून श्वसनमार्गात केलेली शस्त्रक्रिया) करून तात्पुरता हा पॅपिलोमास काढून अमोलला श्वास घेण्यासाठी मार्ग मोकळा केला जात होता. मात्र काही कालावधीनंतर हा पॅपिलोमास पुन्हा येत असे. यामुळे त्याच्यावर दर ४ महिन्यांनी शस्त्रक्रिया करावी लागात होती. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याच्यावर आतापर्यंत पुण्यातील रुग्णालयात ५४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.अमोलचा हा त्रास असह्य असल्याने अखेर त्यास मुंबईतील कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ जून, २०१९ ला त्याच्यावर मुंबईच्या कोहिनूर रुग्णालयात ५५ वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पॅपिलोमासपासून कायमची सुटका करण्यात आली. अनेक वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर आता त्यापासून सुटका झाल्याने आमोल आनंदित आहे. त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, अमोल म्हणाला, कोहिनूर रुग्णालयात माझ्यावर ५५ वी शस्त्रक्रिया झाली.आता मला खूप बरं वाटतं आहे. मी आता मुक्तपणे संवाद साधू शकतो आणि पॅपिलोमास पुन्हा येणार नाही अशी आशा आता मला आहे.
आरआरपी हा दुर्मिळ आजार असून ५ हजार व्यक्तींपैकी एका व्यक्तीमध्ये तो आढळून येतो. अमोल रुग्णालयात आल्यावर त्याच्यावर तातडीने एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर कॉब्लेशनच्या ( ही एक नवी पद्धत असून सर्जन एका विद्युतभारीत हँडपीसचा वापर करून कमी तापमानावर ऊती जाळतो ) आणि लेझर थेरपीच्या सहाय्याने उपचार करण्यात आले. ही शस्त्रक्रिया अँप्नोइया तंत्राचा वापर करून करण्यात आली. पॅपिलोमास पुन्हा उगवू नयेत, यासाठी अँटिव्हायरल एजंट हे औषध त्यास देण्यात आले आहे,अशी माहिती कोहिनूर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी दिली.