आरोग्यनामा ऑनलाइन टीम – छोट्या-छोट्या आजारांचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो. अशा आजारातून लवकर बरे होण्यासाठी डॉक्टरांकडे जाणेही योग्य नसते. यासाठी प्राथमिक उपचार म्हणून निसर्गाची मदत घेणे चांगले ठरू शकते. दैनंदिन जीवनात आपण अनेक औषधी पदार्थांचा वापर करत असतो. पण आपल्याला त्याबाबत माहिती नसते. असे पदार्थ वापरून करण्यात येणारे उपचार लाभदायक असतात.
मक्याचे दाणे वाटून त्यात काळे मीठ मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खावे. घशाची सूज कमी होऊन खोकल्यात आराम मिळेल. एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे आयोडीनयुक्त मीठ मिसळून चुळा भरल्याने घशाचा त्रास कमी होतो. गरम मीठ कापडात टाकून गळ्याला शेक द्यावा आराम मिळतो. तसेच गहू आणि हरभरा पाण्यात उकळावा. हे पाणी दररोज अर्धा-अर्धा ग्लास प्यावे. यामुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो.
त्वचा रोगासाठी मीठ न टाकता हरभरा पीठाची भाकरी करावी. दीड ते दोन महिने अशा भाकरी खाल्ल्यास अनेक रोगांपासून बचाव होतो. तसेच त्वचा रोगापासून रक्षण होते. खोबरेल तेलात थोडेसे लिंबू रस मिसळून दररोज सकाळ -संध्याकाळ डोक्याची मालिश करावी. केसगळती कमी होते. आंब्याची पाने गरम करून त्यावर मीठ लावून सुजलेल्या भागावर लावावे. दोन ते तीन तासांपर्यंत दुखणारा भाग बांधून ठेवावा. काही वेळात दुखणे कमी होते.
कापणे किंवा जखम झालेल्या जागी कोमट मध लावून त्यावर पट्टी बांधावी. असे केल्याने दुखणे कमी होऊन आराम मिळतो. तूरडाळ रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावी. या पाण्याच्या मदतीने दिवसातून तीन वेळा चुळा भराव्यात. असे केल्याने दोन दिवसांत तोंड सोलण्याची समस्या कमी होते. तुळशीची पाने चांगल्याप्रकारे वाटून त्यात काळी मिरी टाकून चावावे. दम्यात होणारा श्वसनाचा त्रास कमी होतो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी अर्धा ग्लास गाजर रस पिल्यास त्वचा उजळते. तसेच त्वचेच्या नव्या पेशींची निर्मिती होते. काही लवंगा घेऊन त्याला हलके रगडावे. या लवंगा स्वच्छ कपड्यात घेऊन त्याचा वास घ्यावा. डोकेदुखीत आराम मिळतो. दात दुखत असल्यास कापूर लावावा. कापसात थोडासा कापूर ठेवून तो लावल्यास आराम मिळतो.