कडक उन्हातही स्वाइन फ्लूची तीव्रता कायम  

कडक उन्हातही स्वाइन फ्लूची तीव्रता कायम  
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कडक उन्हातही स्वाइन फ्लूची तीव्रता कायम आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत दीडशे जणांना या आजाराची लागण झाली असून, आठ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. थंडीच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव अधिक मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु बदलत्या वातावरणाचा स्वाइन फ्लूच्या विषाणूंवर आता फारसा परिणाम होत नसून, कडक उन्हातही या आजाराचे विषाणू तग धरून राहात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे जेमतेम ७ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील थंड वातावरणात या आजाराचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढून या आजाराची लागण झालेल्यांची संख्या ४२ वर पोहोचली. या महिन्यात तब्बल चार जणांचा या आजाराने बळी घेतला. मार्च महिन्यातही स्वाइन फ्लूग्रस्तांचा आकडा वाढता राहिला. या महिन्यात सर्वाधिक ४९ जणांना स्वाइन फ्लू झाल्याची आकडेवारी समोर आली होती. मार्चमध्येही दोन जणांचा या आजाराने बळी घेतला. एप्रिलमध्ये मात्र वाढलेले तापमान या आजाराच्या प्रादूर्भावाला अटकाव निर्माण करेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती; परंतु या महिन्यातही तब्बल ३७ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आल्याने वाढत्या तापमानातही स्वाइन फ्लूचे विषाणू तग धरून असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात इंदिरानगर व पंचवटीतील रासबिहारी शाळेच्या परिसरातील प्रत्येकी एकाचा या आजाराने मृत्यू ओढावला. त्यानंतर आता मे महिन्यातील कडक उन्हातही स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव कायम राहिला आहे. १ ते १० मे या कालावधीत स्वाइन फ्लूचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु