Savethedoctors : आयएमएच्या डॉक्टरांचा १७ जूनला देशव्यापी संप

Savethedoctors : आयएमएच्या डॉक्टरांचा १७ जूनला देशव्यापी संप

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कोलकात्यातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल देशभरातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आता आता देशव्यापी संप करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे. यानुसार आयएमए १७ जून, २०१९ रोजी देशव्यापी संप करणार आहे. देशात डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हा संप असणार आहे. त्यामुळे देशभरातील ३ लाख खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत.

सध्या कोलकात्यातील घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, १७ जूनच्या आदोलनाबाबत माहिती देताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, कोलकात्यामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ १७ जूनला देशभरातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारने दोषींवर कारवाई करण्यासाठी ठोस कायदा करावा, अशी आमची मागणी आहे. हल्लेखोर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्याचे दिसत आहे.

१७ जूनच्या संपादरम्यान खासगी क्लिनिकमधील ओपीडी बंद राहतील, मात्र आपात्कालीन सेवा सुरू असतील. १० जूनला कोलकात्याच्या एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले डॉक्टर जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ११ जूनपासून पश्चिम बंगालमधील डॉक्टर संपावर आहेत. तसेच एनआरएस मेडिकल कॉलेजमधील प्राचार्य आणि अधीक्षकांसह ७ वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना संप मागे घेऊन कामावर रूजू होण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंतची मुदत दिली. मात्र सरकारचा आदेश धुडकावून कोलकात्यातील डॉक्टरांनी संप कायम ठेवला. जोपर्यंत सुरक्षा मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु