तंबाखूमुक्ती साठी शैक्षणिक संस्थांमध्ये निरीक्षक नेमण्याचे निर्देश

तंबाखूमुक्ती साठी शैक्षणिक संस्थांमध्ये निरीक्षक नेमण्याचे निर्देश

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशभरातील शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी शैक्षणिक संस्था खासकरून उच्च माध्यमिक शाळांना तंबाखूमुक्त करण्यासाठी विद्यार्थी किंवा शिक्षकांमधून निरीक्षक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मंत्रालयाकडून नंतर प्रशस्तिपत्रदेखील दिले जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व शैक्षणिक संस्थांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन रोखण्यावर भर देण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांमधून निरीक्षक नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवड करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव व फोन क्रमांक शाळेच्या परिसरात लावणे बंधनकारक आहे. एका संस्थेमध्ये अनेक निरीक्षकांची निवड केली जाऊ शकते. तंबाखूला आळा घालण्यासाठी ही चांगली गोष्ट ठरेल. उदाहरणार्थ शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये अशा प्रकारच्या निरीक्षकाची निवड केली जाऊ शकते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणाऱ्यांना मंत्रालयाकडून तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शैक्षणिक संस्थेच्या परिसर आणि त्याच्या ३०० फुटांपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. शक्य असलेल्या शैक्षणिक संस्थांनी यासाठी स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकारी, समुदाय व पालकांची मदत घ्यावी, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

सुधारित मार्गदर्शक तत्त्वे ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या औचित्यावर जारी करण्यात आली होती. यामध्ये शाळा व शैक्षणिक संस्थांना तंबाखूजन्य पदार्थांना आळा घालण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हेनुसार देशातील १५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे २८.६ टक्के लोक हे तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. देशात प्रत्येक वर्षी तंबाखूमुळे १३ लाखांहून अधिक लोक दगावतात. तर जवळपास ३७ लाख लोकांना फुप्फुसाचे आजार व १५ लाख लोकांना कर्करोगाचा सामना करावा लागतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु