डॉ. पायल तडवीच्या कुटुंबाला सरकारकडून १० लाखांची मदत

डॉ. पायल तडवीच्या कुटुंबाला सरकारकडून १० लाखांची मदत

आरोग्यनामा ऑनलाइन – नायर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे. तडवी कुटुंबीयांना सोमवारी दहा लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. पायल यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

डॉ. पायल यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य सरकारने करावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयातील वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन संचानलनालयाने गठीत केलेल्या समित्यांकडून तडवी कुटुंबीयांकडे विचारणा करण्यात आली. डॉ. पायल हिला वर्षभर सहकारी डॉक्टरांकडून कशी वागणूक मिळत होती, तिला कोणत्या प्रकारचा त्रास दिला जात होता का, त्यासंदर्भातील तक्रार यापूर्वी तिने कधी केली, त्यावर कुटुंबीयांनी कोणती भूमिका घेतली, अशी विचारणा या चौकशीदरम्यान करण्यात आली.

हा चौकशी अहवाल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवण्यात येणार आहे. पोलिस तपास आणि कायद्याच्या कक्षेत रँगिंग प्रकरणामुळे डॉ. पायलने स्वतःचे आयुष्य संपवल्याचे सिद्ध झाल्यास आरोपींचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे. डॉ. पायलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याचा तपास करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पायलच्या कुटुंबीयांनी सकृतदर्शनी जे पुरावे पुढे येत आहेत ते लक्षात घेऊन आरोपींचे वैद्यकीय परवाने कायमचे निलंबित करावेत अशी मागणी केली. पायलने आत्महत्या केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यास सत्या उघडकीस येईल, असे पायलच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु