एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एका पॅथॉलॉजिस्टने एकाच प्रयोगशाळेत काम करावे, असा भारतीय वैद्यक परिषदेचा नियम आहे. परंतु, असा नियम असूनही काही पॅथॉलॉजिस्ट अनेक ठिकाणी काम करत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान, हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला असता पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पॅथॉलॉजिस्टवर सरकारने कोणती कारवाई केली या प्रश्नाचे उत्तर सभागृहात देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले, एक पॅथॉलॉजिस्ट अनेक प्रयोगशाळेत काम करत असल्याच्या तक्रारी आल्या असून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून याबाबत चौकशी केली जात आहे. परिषदेकडे आलेल्या तक्रारींनुसार ५ वैद्यकीय व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील बेकायदा पॅथलॉजी लॅबवर कारवाई करण्यासंदर्भात २४ मे, २०१६ रोजी जीआर तयार करण्यात आला होता. परंतु, या जीआरच्या फाईलवर स्वाक्षरी झालेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असता, बोगस पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी जीआर काढणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु