बोनमॅरो दानामुळे ५ थॅलेसेमियाग्रस्तांना ‘जीवनदान’

बोनमॅरो दानामुळे ५ थॅलेसेमियाग्रस्तांना ‘जीवनदान’

मुंबई : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अवयवदानाबाबत समाजामध्ये सध्या चांगली जागृती होत आहे. अनेक ब्रेन डेड रूग्णांचे नातेवाईक अवयवदानास तयार होताना दिसत आहेत. यामुळे अनेक रूग्णांना जीवदान मिळत असल्याचे सकारात्मक चित्र राज्यात दिसत आहे. मागील काही दिवसांत अवयवदानामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे बोन मॅरो दानामुळेही अनेक रूग्णांना जीवदान मिळू शकते. मात्र, याबाबत अद्याप विशेष जनजागृती झालेली नाही. जिवंतपणी बोन मॅरो दान केल्याने ५ थॅलेसेमिया रुग्णांना जीवदान मिळाले आहे. मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

रक्तपेशींमध्ये अस्थीमज्जा (बोन मॅरो) हव्या त्या प्रमाणात निर्माण होत नसल्यास थॅलेसेमिया हा आजार होतो. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा आजार ज्या रूग्णाला होतो त्यास दर महिन्याला रक्त चढवावे लागते. आतापर्यंत या रुग्णांना रक्त बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु, बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे रूग्णांची या आजारातून कायमची सुटका करणे शक्य झाले आहे. मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात ५ रुग्णांवर बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले आहे. काही दात्यांनी जिवंतपणी बोन मॅरो दान केल्याने ५ जणांचा जीव वाचू शकला आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये बोन मॅरोचे प्रत्यारोपण केल्याने शरीरात आवश्यक त्या प्लेटलेट्स आणि रक्तपेशी तयार होऊ शकतात.

ब्लड कॅन्सरचा रूग्ण कधीही बरा होत नाही, मात्र बोन मॅरो प्रत्यारोपणामुळे अशा रुग्णांची जगण्याची शक्यता जास्त वाढते. थॅलेसेमियाच्या रुग्णांच्या उपचारासाठीही बोन मॅरो प्रत्यारोपण जीवनदान आहे. वोक्हार्ट रुग्णालयात आतापर्यंत ४१ ते ६२ वयोगटातील थॅलेसेमियाने त्रस्त असलेल्या रुग्णांवर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारतात सुमारे चार कोटी लोक थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळून येतो. स्त्री आणि पुरूष हे दोघंही थॅलेसेमिया मायनर असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बीट थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता असते. यावर बोन मॅरो प्रत्यारोपण हा एक उपाय आहे. मात्र ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्तपेशी जुळणाऱ्या व्यक्तीची गरज असते. अचूक रक्तदाता मिळाल्यासच हे प्रत्यारोपण करता येते. त्यामुळे थॅलेसेमिया आणि बोन मॅरो दान याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे वोक्हार्ट रुग्णालयातील हेमेटोलॉजिस्ट डॉ. दीपांजन हलदर यांनी सांगितले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु