कर्नाटकातील चिमुरडीच्या शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्रीयन कुटुंबाकडून मदत

कर्नाटकातील चिमुरडीच्या शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्रीयन कुटुंबाकडून मदत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच पुढे असतो, हे अनेकवेळा दिसून आले आहे. घटना कोणतीही असो, नैसर्गिक आपत्ती अथवा वैद्यकीय मदत महाराष्ट्राने कधीही जातपात, धर्म, प्रांत याचा कधीही विचार न करता आपल्या मनाची विशालता दाखवून दिली आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. कर्नाटकच्या एका २२ दिवसांच्या चिमुरडीवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातील एका कुटुंबाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यामुळे या बाळाचे प्राण वाचले आहेत. पुण्यातील ससून रूग्णालयात या चिमुकलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने या बाळाला जीवदान मिळाले आहे. या मुलीचे कुटुंब मूळचे कर्नाटकमधील असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळत नव्हता. परंतु, काही दानशूर व्यक्तींनी स्वतंत्रपणे आर्थिक मदत केल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करता आली.

याबाबत ससून जनरल रूग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सत्यवान सुरवासे यांनी सांगितले की, २२ दिवसांच्या मुलीस हृदयाची समस्या होती. तिचे प्राण वाचण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. या मुलीचे पालक कर्नाटकातील असल्याने महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र एका कुटुंबाने पुढाकार घेत पैसे दान करण्याची तयारी दर्शविल्याने त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. स्वताहून पुढाकार घेऊन मदत करणारी लोकं खूप कमी आहेत. १० ते १२ प्रकरणांमध्ये लोकांनी पुढे येऊन पैसे दान केलेत.

ज्या रूग्णांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही अशा रूग्णांसाठी हा निधी उपयोगी येतो, असे ससून रूग्णालयातील एम.बी. शेळके म्हणाले. दरम्यान, गेल्यावर्षी वैद्यकीय उपकरणांसाठी स्वतंत्र निधीतून ससूनला १२० करोड रूपये मिळाले होते. परंतु, त्यापैकी केवळ २ ते ३ लाख रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे लोकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे. तसेच स्वतंत्र दात्यांकडून २ ते ३ लाख रूपये जमा झाले आहेत. गरजू रूग्णांसाठी ही फार मोठी मदत आहे. लोकांकडून दान करण्यात येणाऱ्या या पैशांवर कर लागू होत नाही. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दान केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु