नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

नियमित तोंडाची स्वच्छता  ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – तोंडाची स्वच्छता नियमित केल्यास हृदयविकाराचा झटका, मधुमेह यासह अनेक आजारांपासूनही बचाव होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी दिवसातून दोनवेळा ब्रश केल्यास तोंडाचे आरोग्य चांगले राहतेच, शिवाय काही आजारही टाळता येऊ शकतात. दोनदा ब्रश करण्याच्या सवयीमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. अशाप्रकारे तोंडाची स्वच्छता खूप महत्वाची असून त्याचा तुमच्या आरोग्यावर खुप काही परिणाम होत असतो.

मधुमेह असलेल्यांमध्ये हिरड्यांशी संबंधित आजार असण्याची शक्यता तिप्पट असते. तसेच मधुमेहींची ग्लुकोजची पातळी नियंत्रित राखण्याची क्षमता कमी होते. सोबतच हृदय आणि मूत्रपिंडाचा आजार होण्याची भीती असते, असे न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधकांना त्यांच्या संशोधनात आढळून आले आहे. तसेच हिरड्यांशी संबंधित आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या दातांशी जुळलेली हाडे कमकुवत होऊ लागतात. काही रुग्णांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा हा संकेत असू शकतो. काही काळानंतर ते संधिवाताचे कारण बनू शकते, असेही तज्ज्ञ सांगतात. तसेच अलबामा विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, हिरड्यांशी संबंधित आजारामुळे महिलांच्या शरीरात प्रॉस्टाग्लँडिंग वाढते. त्यामुळे वेळेआधी बाळंतपण होण्याची शक्यता वाढते.

दातांना किड लागण्यास सुरुवात होताच शरीरात सी-रिअँक्टिव्ह प्रथिने आणि फायब्रिनोजेनची पातळी वाढू लागते. या घटकांमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच किडलेले दात ताबडतोब काढण्याचा सल्ला न्यूयॉर्क विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देतात. एवढेच नव्हे तर दातांमध्ये असलेले जिवाणू रक्तात मिसळून संसर्ग पसरवतात. यासाठी दात किडणार नाहीत, याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. क्रॉनिक ऑब्सट्रोक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच सीओपीडी आणि दातांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे. तोंडातील जिवाणू फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत संसर्ग पसरवतात. यामुळे सीओपीडी असलेल्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. सिगारेटदेखील या आजाराचे एक प्रमुख कारण मानले जाते, असे अमेरिकन अकॅडमी ऑफ पीरिओडोंटोलॉजीने म्हटले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु