चुकीच्या आहारामुळे कॅन्सर रुग्णांत वाढ 

चुकीच्या आहारामुळे कॅन्सर रुग्णांत वाढ 

आरोग्यनामा ऑनलाईन – कॅन्सर आजाराबद्दलची भिती निरर्थक असून ९७ टक्के कॅन्सर हे चुकीच्या आहारामुळे उद्भवतात. तरी अद्ययावत उपचार व्यवस्थेमुळे आता कुणीही रुग्णाने कॅन्सर आजाराला घाबरण्याची मुळीच गरज नसून त्याऐवजी कॅन्सरचे लवकरात लवकर निदान कसे होईल, हे बघितले पाहिजे. ९० टक्के प्रकरणात शरीरातील बदलाकडे लक्षपूर्वक बघितले तर रुग्ण स्वत:च स्वत:च्या आजाराचे निदान करू शकतो आणि वेळेवर निदान केले तर योग्य उपचाराने कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द कॅन्सर तज्ज्ञ आणि एच. सी. जी. मानवता कॅन्सर सेन्टर नाशिकचे वैद्यकीय संचालक आणि मुख्य सर्जिकल ओन्कोलॉजीस्ट, डॉ. राज नगरकर यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफतांना केले.

के. बी. एच. विद्यालय, मालेगांव-कॅम्पचे प्रांगणात आयोजित स्मृती व्याख्यानमालेचे हे ४९ वे वर्ष आहे. कॅन्सर, मधुमेह व हृदयविकार या आजारांची व्याप्ती अतीशय गंभीर होत चाललेली आहे. अगदी कमी वयातील मुलांना हे आजार होवू घातले आहेत. ही बाब जागतिक वैद्यकीय विश्­वात चिंतेची ठरली आहे. त्यामुळेच संस्थेने यावेळी व्याख्यानमालेत या आजारातील निष्णात व तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केलेले आहे. प्रथम पुष्पात कर्करोग-घ्यावयाची खबरदारी-कारणे-निदान व उपचार याविषयावर अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन करतांना डॉ. नगरकर पुढे म्हणाले, कुठलीही जखम १५ दिवसात बरी होत नसेल, वारंवार अपचनाची स्थिती २ ते ३ आठवडे कायम असेल, शौचाच्या सवयीत बदल व त्यातून रक्त पडत असेल, आवाजात बदल व सततचा खोकला, गिळतांना त्रास होणे ही कॅन्सरची अगदी साधारणशी अशी लक्षणे आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीने अतिशय चाणाक्ष राहून पटकन वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

अगदी अल्प-नाममात्र शुल्कात ह्या तपासण्या उपलब्ध आहेत. दुर्लक्ष करू नका. स्त्रीयांनी आजाराची स्वत:च लक्षणे ओळखायला शिकून घेतले, तर अगदी प्राथमिक अवस्थेत उपचार करून १०० टक्के निरामय जीवनाच्या त्या हकदार ठरतील. भेसळीचे दुध व फळे, पालेभाज्या व अन्य आजारावर जी रासायनिक औषधे फवारली जात आहेत, त्यामुळेही कॅन्सरचे प्रमाण खुपच वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. योग व प्राणायम हे सर्व काळातीत उपयोगी ठरणारे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक, माजी आ. डॉ. अपूर्व हिरे, विश्­वस्त, डॉ. अद्वय हिरे, उपाध्यक्ष, बी. के. देवरे, आदिवासी सेवा समितीचे उपाध्यक्ष पंडीत नेरे यांचेसह शहरातील प्रतिथयश डॉक्टर्स, वकील, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक म. स. गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एफ. शिरुडे यांनी केले. आभार प्रा. श्री. जे. डी. पगार यांनी मानले. अतिथींचा परिचय प्रा. श्रीमती दिपाजंली बोरसे यांनी केला तर सुत्रसंचालन प्रा. श्रीमती विद्या सुर्वे यांनी केले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु