प्रसूतीनंतरचं स्त्री आरोग्य

प्रसूतीनंतरचं स्त्री आरोग्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही स्त्रीची आई झाली की तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. तिच्या शरीराची कार्य करण्याची पद्धतच बदलते. अनेकदा नकारात्मक परिणामांसह विविध स्त्रीरोगांचा त्रास होऊ लागतो. प्रसूतीनंतर अनियमित मासिक पाळीची समस्या ही काहीशी सामान्य आणि अपेक्षित असते. यामागची कारणं अनेक असतात. काही कारणं परस्परसंबंधी असली तरीही या सगळ्याचा परिणाम म्हणून अनियमित मासिक पाळीची समस्या येऊ शकते.

का बदलतात मासिक पाळीची चक्रे

काही सवयी कारणीभूत
खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींचीही या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका असते. तसंच बाळाची काळजी घेताना मनावर येणारा ताण, शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किंवा व्यावसायिक कारणांमुळे तसंच लैंगिक जीवनातील असमाधानामुळे उद्भवणाऱ्या अन्य मानसिक समस्याही याला जबाबदार ठरतात. परिणामी, मानसिक आणि शारीरिक तणाव वाढत जातो आणि जीवनशैलीमध्येही मोठे बदल घडून येतात.

स्तनपान
प्रसूतीनंतर मासिक पाळी अनियमित होण्यामागे हे एक सर्वांत सामान्य कारण आहे. महिला स्तनपान करत असल्याच्या काळात, प्रोलॅक्टीन नावाचं संप्रेरक जास्त प्रमाणात स्त्रवत असतं. याचा थेट परिणाम महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रावर होतो. प्रसूतीनंतरच्या २ ते १८ महिन्यांच्या कालावधीत केव्हाही मासिक पाळी पुन्हा सुरू होऊ शकते. ही सुरुवात नेमकी केव्हा होईल, हे सांगता येत नाही. अनेक गोष्टींमुळे यावर परिणाम होतो. मासिक पाळी पुन्हा सुरू झाल्यानंतर सुद्धा ती नियमित येईल असं नाही.

रक्तस्त्राव
नॉर्मल प्रसूती असो किंवा सिझेरियन. दोन्ही प्रकारच्या प्रसूतींमध्ये रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने मेंदूच्या काही केंद्रांवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. परिणामी, मासिक पाळीचं चक्रही यामुळे कोलमडून पडतं.

उपचार
या व्यतिरिक्त प्रसूतीशी संबंध नसलेल्याही अनेक समस्यांमुळे मासिक पाळी अनियमित होते. थायरॉईड ग्रंथीमुळे मासिक पाळीवर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरतो. या अनेक कारणांमुळे, प्रसूतीनंतर मासिक पाळी अनियमित येऊ शकते.

आहार
आहार अधिक पौष्टिक आणि आरोग्यपूर्ण करण्यासाठी त्यात काही छोटे बदल करावे. वेळेवर जेवल्यामुळे बराच फरक पडू शकतो. साखर आणि कर्बोदके कमी करून ताजी फळे आणि भाज्यांचं सेवन वाढवावं.

* झोपेच्या वेळा आणि सवयींचा अभ्यास करून पुरेसा आराम करावा.
* बाळाकडे लक्ष पुरवताना बराच ताण सहन करावा लागत असल्याने अशी कामे विभागून घेणं आवश्यक ठरतं.
* दिवसातून थोडावेळ व्यायाम करावा.
* योग, प्राणायाम यांसारख्या पर्यायी थेरपींचा तणावमुक्तीसाठी सुयोग्य मार्गदर्शनाखाली अवलंब करावा.

तणावमुक्तीसाठी काही औषधंही डॉक्टरी सल्ल्याने घेता येतात. संप्रेरकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ती उपयुक्त ठरतात.
स्तनपानाच्या कालावधीतही तुम्ही पुन्हा गरोदर राहू शकता. तुमची मासिक पाळी सुरू झालेली नाही, याचा अर्थ तुमचे ओव्ह्युलेशन म्हणजेच स्त्रीबिजांचे फलन होणार नाही, असा होत नाही. त्यामुळे, या कालावधीत डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भनिरोधकांचा वापर करणं आवश्यक ठरतं. प्रसूतीनंतर तुमची मासिक पाळी सुरू झाली असल्यास किंवा लांबली असल्यास किंवा आलीच नसल्यास, तुम्ही पुन्हा गरोदर राहिला नाहीत ना, याची खात्री वैद्यकीय तपासणीतून नक्की करून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु