हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारामुळे होतात छातीत वेदना

हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – छातीत वेदना म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक असा अनेकांचा समज असतो. पण, छातीत वेदना होण्याची अन्य कारणे सुद्धा असू शकतात. त्यामुळे छातीमधील दुखण्याचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. अनेकदा केवळ पित्तामुळेही (अ‍ॅसिडिटी) छातीत वेदना होऊ शकतात. तसेच दुसरे कारण म्हणजे अंजायना म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी पडल्याने छातीत वेदना होऊ शकतात. या वेदना अ‍ॅसिडिटी, गॅस्ट्रोएसोफागिअल रिफ्लक्स या आजारातील वेदनांसारख्याच असतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अंजायना त्रास कार्डिओव्हस्क्युलर विकाराचा इशारा असू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

छातीच्या मध्यभागी, ब्रेस्टबोनच्या खाली वेदना होणे म्हणजे अंजायना होय. काही जणांना या वेदना जबड्याखाली किंवा डाव्या खांद्यात जाणवू शकतात. शारीरिक श्रमानंतर छाती जड झाल्यासारखे वाटणे, छातीवर काहीतरी जड वजन ठेवल्यासारखे वाटणे, अथवा केवळ धाप लागणे, खूप घाम येणे, ही अंजायनाची लक्षणे आहेत. अंजायना या आजारामुळे अस्वस्थता, छातीत वेदना होतात. हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि हृदयाच्या स्नायूंची शक्ती कमी होते. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे वेदना निर्माण होतात. तणाव किंवा शारीरिक श्रमांमुळे या वेदना वाढतात आणि काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर वेदना कमी होतात. अंजायनाचे निदान हे ईसीजी, टूडी इको कार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट केल्यानंतर होते. यासाठी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अंजायनाचा अटॅक आल्यास तातडीने रुग्णालयात गेले पाहिजे.

स्टेबल अंजायना – अंजायनाच्या या प्रकारात काही शेकडा मीटर चालल्याप्रमाणे छातीत वेदना होतात. विश्रांतीनंतर या वेदना कमी होतात.

अनस्टेबल अंजायना- या प्रकारामध्ये वेदना अचानक सुरू होतात. काही वेळात त्या खूप वाढतात. अस्थिर अंजायनाचा त्रास विश्रांती घेत असताना किंवा झोपेत, कोणतेही कारण नसताना सुरू होतो.

प्रिंझमेंटल अंजायना – यामध्ये धमन्या आक्रसल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाची अस्वस्थता किंवा वेदना होतात. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबू शकतो. अगदी टोकाच्या गंभीर प्रकरणात हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होऊन रुग्णाचा अचानक मृत्यू होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु