नवजात बालकांच्या काळजीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व : डॉ. तुषार पारीख

नवजात बालकांच्या काळजीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व : डॉ. तुषार पारीख

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जागतिक प्रीमॅच्युरिटी डे दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी असतो. पूर्ण दिवस भरण्याआधी जन्माला येणारी बालके आणि त्यांच्या कुटुंबांच्या समस्या यासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व आहे. जगभरात दरवर्षी सुमारे 15 दशलक्ष म्हणजे सुमारे 10 टक्के बालके वेळेआधीच जन्माला येतात. या वर्षीची संकल्पना आहे ‘बॉर्न टू सून : प्रोव्हायडिंग द राइट केअर,   अ‍ॅट द राइट टाईम, इन द राइट प्लेस.’ (वेळेआधी जन्म : योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य काळजी घेणे).

गरोदरपणाचे 37 आठवडे पूर्ण करण्याआधी जन्माला येणाऱ्या बाळाला प्रीमॅच्युअर बेबी म्हणतात. अशा बाळांना अत्यंत खास अशा वैद्यकीय काळजीची गरज असल्याने त्यांना नीओनॅटल इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवले जाते. कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत, गुंतागूंत होऊ नये यासाठी या बाळांची जन्मानंतर तातडीने याप्रकारची काळजी घेतली जाण्याची गरज असते.

नीओनॅटल केअरमध्ये गोल्डन अवर काय असतो ?
या प्रीमॅच्युअर बालकांच्या जन्मानंतर पहिला एक तास ‘गोल्डन अवर’ म्हणजेच सुवर्णतास समजला जातो. जन्माला आल्यानंतर पहिल्या 60 मिनिटांत बालकाची कोणत्या प्रकारची खास काळजी घेतली जावी, यावर गोल्डन अवरमध्ये भर दिला जातो. (हा काळ बालकाच्या जन्माच्या क्षणापासूनच सुरू होतो कारण बाळाला जन्म दिल्यानंतर आईचे शरीर, संप्रेरकांची पातळी, गर्भाशयाचा आकार हे सारं काही पुन्हा गरोदरपणाच्या आधीच्या स्थितीस येण्यास सुरुवात होते.) गोल्डन अवरची ही संकल्पना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकच्या संदर्भातही वापरली जाते. यातही त्रास सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या तासाभरात घेतल्या जाणाऱ्या त्वरीत काळजीमुळे अधिक चांगले परिणाम दिसतात.

बालकाच्या आयुष्यातील या पहिल्या तासात काय आहे, हे जाणून घ्या?
जन्माच्या वेळी या बाळांच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो त्यांचा श्वासोच्छवास सुरू करणे आणि आवश्यकता भासल्यास योग्य पद्धतीने श्वसनाला साह्य करणे. बऱ्याचदा या बालकांना जन्मानंतर कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्यांची श्वसनक्रिया सुरू करावी लागते. कृत्रिम श्वासोच्छवासाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात आणि पूर्ण दिवसांनंतर (37 आठवड्यांनंतर) जन्मलेल्या बाळांसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींच्या तुलनेत काहीशा नाजूक असतात. म्हणजेच, गोल्डन अवरमध्ये बालकांना कृत्रिम श्वासोच्छवास देणे आणि त्यानंतरची काळजी यांचा समावेश असतो. या बाळांना नीओनॅटल इंटेसिव्ह केअरमध्ये नेणे हेसुद्धा एक आव्हान असते कारण ही बाळं फारच नाजूक असतात आणि या टप्प्यात त्यांच्यामध्ये काही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या बालकांसाठीच्या अ‍ॅम्ब्युलन्सही प्रोढांसाठीच्या अ‍ॅम्ब्युलन्सहून वेगळ्या असतात. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बेबी इन्क्युबेटर आणि नीओनॅटल वेंटिलेअर आणि देखभालीसाठी आवश्यक इतर सर्व प्रकारची साधने असावीत.

अनेक अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे की ‘गोल्डन अवर’च्या संकल्पनेमुळे प्रीटर्म बालकांमधील हायपोथर्मिया, हायपोग्लेसेमिया इंट्रावेंट्रिक्युलर हेमोरेज (आयव्हीएच), रेटिनोपथी आणि ब्रोंचोपल्मनरी डिस्प्लासिया (बीपीडी) हे त्रास कमी करण्यात बरेच साह्य मिळते. वेंटिलेटरची गरज असणाऱ्या प्रीटर्म बालकांना बऱ्याचदा सर्फक्टंट थेरपीची गरज भासते. सर्फक्टंट हा एक प्रकारचा लिपिड घटक आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो थेट श्वासनलिनेत टाकला जातो. वेळेआधी जन्माला आलेली जी बालके आजारी असतात आणि ज्यांना हायपोग्लेसेमिया होण्याचा धोका असतो त्यांना गोल्डन अवरमध्येच योग्य मात्रेत ग्लुकोज मिळणे आवश्यक असते, हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय, गोल्डन अवरच्या काळात योग्य काळची घेतली जायला हवी. योग्य पद्धतीने हात धुणे आणि संसर्गाला दूर ठेवणारी काळजी घेतल्यास जंतूसंसर्ग टाळता येतो तसेच सुरुवातीच्या काळातील काळजी, वजन नोंदवणे आणि स्तनपान याचीही काळजी घेतली जायला हवी.

इतकेच नाही, काही वेळा वेळेआधी बाळाचा जन्म झाल्यास मातेलाही जंतूसंसर्ग होऊ शकतो. त्यामुळे, आईला संसर्ग झाला असलयाने अशा बालकांना पहिल्या तासाभरातच जंतूसंसर्गाचे उपचार द्यायला हवेत. शिवाय, सर्व नोंदी नोंदवणे आणि त्यातील बदलांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. तुम्हाला माहीत आहे का? नवजात बालकाचे हृदयाचे ठोके, श्वासाचा वेग, इनव्हॅसिव्ह किंवा नॉन-इनव्हॅसिव्ह रक्तदाब, सॅच्युरेशन, रक्तातील साखर आणि कॅपिलरी रीफिलचा कालावधी तपासला जायला हवा आणि नोंदवला जायला हवा.
महत्त्वाचे : अत्यंत धोकादायक स्थितीतील या नवजात बालकांना हाताळणारे नीओनॅटोलॉजिस्ट सुयोग्यरित्या प्रशिक्षित असावेत. या प्रकारची आव्हानात्मक बाळंतपणे हाताळण्याचा तसेच हायपोथर्मिया, रेकॉर्ड ठेवणे, पालकांचे समुपदेशन अशा गोल्डन अवरमधील सर्व बाबींचे त्यांना योग्य प्रशिक्षण असावे. यंदाच्या वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी डेची संकल्पना आहे ‘बॉर्न टू सून: प्रोव्हायडिंग द राइट केअर, अॅट द राइट टाइम, इन द राइट प्लेस’. गोल्डन अवरमध्ये वेळेवर मिळालेल्या योग्य काळजीमुळे चांगले परिणाम दिसून येतात, यावर या संकल्पनेचा भर आहे. तसेच, एखाद्या मातेला वेळेआधीच बाळाला जन्म द्यावा लागणार असल्याचे लक्षात आल्यास नीओनॅटल आयसीयू सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणीच बाळंतपणासाठी जावे, हेसुद्धा यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

डॉ. तुषार पारीख डीएम (नीओनॅटोलॉजी), कन्सलटंट नीओनॅटोलॉजिस्ट  अ‍ॅण्ड पीडि अ‍ॅट्रिशन, मदरहूड हॉस्पिटल, खरडी, पुणे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु