‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कान हा शरीराचा खूप महत्वाचा अवयव आहे. जन्मजात बहिरेपणा असणारा व्यक्ती केवळ काहीच ऐकू येत नसल्याने बोलूही शकत नाही. यावरूनच कान या इंद्रियाचे महत्त्व लक्षात येते. कान व्यवस्थित काम करत नसतील तर दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वयोमानानुसार ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणजेच बहिरेपणा येता. ५० ते ६० वर्षे वयात असे होणे सामान्य असले तरी काहीवेळा ही समस्या युवावस्थेतही त्रासदायक ठरू शकते. कानांची योग्य काळजी न घेणे हे यामागील कारण असून शकते. त्यामुळे कानांची ठराविक कालावधीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक ठरते.

इअरफोनचा अतिवापर करणे टाळा

बहिरेपणा ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे किंवा पीडित व्यक्तीच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे होऊ शकते. ही समस्या का निर्माण होते, यापाठीमागील कारणे जाणून घेतल्यास योग्य ती काळजी घेता येऊ शकते. म्हणूनच कारणे जाणून घेणे महत्वाचे ठरते. सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने तसेच इअरफोन आणि हेडफोनचा अतिरेक वापर केल्याने बहिरेपणा येऊ शकतो. ही समस्या स्थायी आणि अस्थायी दोन्हीही प्रकारची असू शकते.

डॉक्टरांकडून कानांची नियमित तपासणी करा

ऑटोक्लेरॉसिस ही एक अनुवांशिक समस्या आहे. मिडल इअरमध्ये असलेल्या छोट्या-छोट्या हाडांच्या आसपास जेव्हा एखादे नवीन हाड विकसित होते, तेव्हा इअरड्रम ते इनर इअरपर्यंत कोणताच आवाज किंवा माहिती ट्रान्समिट होत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला कमी ऐकायला येते. यावर उपचार केल्यास ही समस्या दूर करता येते. तसेच कान साफ न केल्यानेही बहिरेपणा येतो. कानाच्या पोकळीमध्ये जास्त मळ, घाण साचल्याने ऐकण्याची क्षमता कमी होते. इअर वॅक्स कानामध्ये धूळ आणि हानिकारक जिवाणूंना रोखते. मात्र, वेळोवेळी कान स्वच्छ न केल्यास कानातील मळ वाळून कडक होतो आणि अडथळा निर्माण होतो.

इअर बड्सचा आणि कापसाचा वापर करा

कानाचा आतील भाग खूप नाजूक असतो. कान साफ करताना पिन किंवा टोकदार वस्तूंचा वापर केल्याने कानाला दुखापत होते. यामुळे सुद्धा बहिरेपणा येतो. अशा टोकदार वस्तूंऐवजी इअर बड्सचा आणि कापसाचा वापर केल्यास ते अधिक सुरक्षित ठरते. कानामध्ये संसर्ग झाल्याने अस्थायी बहिरेपणा येऊ शकतो. संसर्गामुळे कानाच्या मध्यमार्गात अडथळा येतो. त्यात पस तयार होतो. अशा स्थितीत कानांचे पडदे व्यवस्थित काम करू शकत नसल्याने कमी ऐकू येते.

मोठ्या आवाजापासून दूर रहा

मोठा आवाज हे बहिरेपणा येण्याचे कारण असू शकते. सतत मोठा आवाज ऐकल्यास कानाच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. सार्वजनिक ठिकाणी मोठा आवाज असल्यास ऐकण्याची शक्ती कमजोर होते. अशा वातावरणात काम करावे लागत असल्यास कानांच्या सुरक्षेसाठी कानांमध्ये इअर प्लग्स लावावेत. तसेच काही वेळा मोठ्या स्फोटांच्या भयंकर आवाजामुळेही बहिरेपणा येऊ शकतो. अशावेळी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले पाहिजेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु